सावेडी : सराफ बाजारामध्ये ‘गुलाबी’ हवा! सोने खरेदीसाठी सराफा दुकानात गर्दी

सावेडी : सराफ बाजारामध्ये ‘गुलाबी’ हवा! सोने खरेदीसाठी सराफा दुकानात गर्दी

सावेडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : रिझर्व बँकेने दोन हजाराची नोट चलनातून माघारी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर सराफ बाजारात नोट खपविण्यासाठी सराफ बाजारात गर्दी झाली आहे. सराफ व्यवसायिकांच्या अटीशर्तीनुसार एकाच कुटुंबातील अनेकांच्या नावे सोने खरेदी केली जात आहे. सराफ बाजारातील गुलाबी नोटेच्या हवेने कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. बँकेतून दोन हजाराच्या नोटा बदली करताना वीस हजार रुपयांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे वीस हजार रुपयांपेक्षा 2 हजारांच्या जास्त नोटा आहेत त्यांचा कल सोने खरेदीकडे वळला आहे. परिणामी सराफ बाजारात गर्दी लोटल्याचे चित्र आहे.

रिझर्व बँकेने 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मे-जून मधील लग्नतिथी व पुढील मुहूर्तासाठी आताच खरेदी सुरू झाल्याने सोने खरेदीत वाढ झाल्याचे सराफ व्यवसायिक सांगतात. बँकेत वीस हजारांपेक्षा अधिक दोन हजाराच्या नोटा जमा केल्या तर भविष्याच चौकशीचा भुंगा मागे लागू शकतो, या भितीपोटी सराफ बाजारात सोने खरेदीला अनेकांनी प्राधान्य दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

आधार, पॅन सक्ती!

सराफ व्यवसायिकांना 50 हजारांच्या पुढील रकमेसाठी शासनाने संबंधित ग्राहकांचे आधार, पॅनकार्ड सक्ती केल्याने 50 हजार रुपयांपर्यंत दोन हजारांच्या नोटा स्वीकारताना त्यांचे आधार, पॅनकार्ड घेतले जात आहे. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांचे नावे सोने खरेदीचा फंडा अनेकांनी सुरू केला आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा देवून चालू बाजारभावाप्रमाणे ग्राहकांना किंवा गुंतवणूकदारांना सोने-चांदी खरेदी करता येईल. मात्र 50 हजार पेक्षा जास्त खरेदी असेल तर केवायसी देऊन दोन लाखापर्यंत रोख स्वरूपात सोने खरेदी येईल, असे व्यवसायिकांचे धोरण आहे.

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 1000 ची नोट चलनातून बाद केली त्यावेळीदेखील अनेकांनी सोने खरेदी केली होती. सोने खरेदीतून केलेली गुंतवणूक अनेकांना लखलाभ ठरली. आताही गुलाबी नोटा खपविण्यासाठी सोने खरेदीकडे कल वाढला आहे. सोने खरेदीनंतर सोने तारण कर्ज आणि विक्री करणे सोपे असल्याने 2 हजार रुपयांच्या नोटा घेऊन नागरिक सोने खरेदी करत आहेत.

                                                         – राजेश सोनईकर,
                                                       सराफ व्यावसायिक, नगर

logo
Pudhari News
pudhari.news