संगमनेर शहर : कोट्यवधींचा गंडा घालणारा शहाणे पसारच! | पुढारी

संगमनेर शहर : कोट्यवधींचा गंडा घालणारा शहाणे पसारच!

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : चार बँकांमधील बनावट सोने तारण प्रकरणी संशयित जगदीश लक्ष्मण शहाणे गेल्या तीन महिन्यांपासून पसार आहे. पोलिसांना तो अद्यापि सापडला नाही. 196 कर्ज प्रकरणांमध्ये 6 कोटी 10 लाख 12 हजार 116 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यात पहिल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळताच शहाणे कुटुंबासह पसार झाला. त्यानंतर त्यांचे विविध कारणामे उघडकीस आले.

तब्बल 4 गुन्हे दाखल होऊनही शहर पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. शहरातील मालदाड रोडवर राहणारा जगदीश लक्ष्मण शहाणे (पंढरपूरकर) याने शहरात नव्याने शाखा सुरू झालेल्या अनेक बँकांसह पतसंस्थांचा सुवर्णपारखी (गोल्ड व्हॅल्युअर) म्हणून काम पाहिले. या दरम्यान गेल्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत त्याने विविध 4 बँकांमधून 6 कोटी 10 लाख 12 हजार 116 रुपयांचे तारण केलेले बनावट सोने खरे असल्याचे बँकांना भासवून सर्व प्रकरणे मंजूर केली.

फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेत त्याने केलेल्या 137 प्रकरणातील 33 कर्ज प्रकरणांत बनावट सोने आढळल्यानंतर पहिल्यांदा वाचा फुटली, मात्र त्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळताच कोट्यवधी रुपये घेऊन तो पसार झाला. दरम्यान, 20 मार्च रोजी नाशिक मर्चंट्स को-ऑ. बँकेत त्याने 136 जणांच्या संगनमताने तब्बल 4 कोटी 20 लाख 15 हजार 890 रुपयांचे सोने तारण ठेवून फसवणूक केल्याचे समोर आले.जी. एस. महानगर को-ऑ. बँकेत 36 खात्यांद्वारे 22 आरोपींनी 82 लाख 57 हजार 834 रुपये व प्रवरा बँकेतील 8 प्रकरणांमधून 38 लाख 44 हजार 442 रुपयांचे बनावट सोने तारण ठेवल्याचे उघड झाले.

पोलिसांसह ग्राहक अन् बँकाही शांत का..?

शहाणे याने यापूर्वी अनेक बँकांना गंडा घालून तो संगमनेरला पळून आला. बँकेचे मॅनेजर, ग्राहक व सराफ अशा तिघांची भूमिका आता संशयास्पद झाली आहे. यातील बहुतेक प्रकरणांमध्ये शहाणे याने केवळ व्यक्तिंचा वापर केला आहे. प्रत्यक्षात बँकेत ठेवण्यात आलेले बनावट सोने हे त्याच्याकडचेच आहे, मात्र काही प्रकरणांत कर्जदाराने स्वतःचे खरे सोने देवूनही त्यांचा समावेश आरोपींच्या यादीत आहे. यात काही ग्राहकांसह आणि शहाणेच्या विरोधात संगमनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला, परंतु कारवाई गुलदस्त्यातच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Back to top button