अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नियंत्रण कक्ष | पुढारी

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नियंत्रण कक्ष

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या पालकमंत्री नियंत्रण कक्ष (वाररूम)चे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. विविध विकासकामे व भाजप पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यासाठी फडणवीस नगर जिल्हा दौर्‍यावर आले होते. नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी नवीन शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन सकाळी 11 वाजता फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात यांत्रिकीकरण योजनेंतर्गत दहा शेतकर्‍यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सहाव्या मजल्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या संकल्पनेतून स्थापित झालेल्या पालकमंत्री नियंत्रण कक्षाचे (वाररूम) उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, मोनिका राजळे व बबनराव पाचपुते, तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.

या वेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी पालकमंत्री कक्षाबद्दल माहिती दिली. जिल्ह्यातील विकास योजनांसह ई-सेवाबाबतची माहिती एका क्लिकवर पालकमंत्र्यांना तत्काळ समजणार आहे. कोणती योजना राबविण्यात कोणती अडचण आहे, याची सविस्तर माहिती पालकमंत्र्यांना मिळू शकते, असे मापारी यांनी सांगितले.

राज्यातील पहिला उपक्रम

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कक्ष (वाररूम) हा पथदर्शी उपक्रम राज्यात पहिल्यांदा अहमदनगर जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. त्याचे कौतुक फडणवीस यांनी केले. नगर जिल्ह्याने यापूर्वी असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राज्याला दिले. त्यांची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी झाली, असे ते या वेळी म्हणाले.

Back to top button