राहुरी : विरोधकांचे मुंगेरीलाल के हसीन सपने : कृषिमंत्री अब्दुल सत्तार | पुढारी

राहुरी : विरोधकांचे मुंगेरीलाल के हसीन सपने : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : देशात व राज्यात भाजप शासन सत्तेत येणार आहे. देशातील विरोधी पक्ष एकत्र येऊन सत्तेसाठी मुंगेरीलाल के हसीन सपने रंगवत आहेत. नुकतेच दिल्ली व पंजाबचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व भगवंत मान उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आल्याचे कळले. कोणी कितीही आदळ आपट करा. तरीही देशात भाजपचे तर राज्यात भाजप-शिंदे सेना सत्तेत येणारच, असा विश्वास कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात आले, तेव्हा सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे आहेत. हात दाखवा गाडी थांबवा अशी त्यांची प्रतिमा आहे. मागील मुख्यमंत्री एसी गाडीत असताना काचही खाली घेत नव्हते. आताचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान शासनाने वेगवेगळ्या 47 योजना जनतेसाठी आणल्या.

जे अडीच वर्षे घरातच बसून होते, त्यांच्या पोटात आता गोळा उठला आहे, अशी टीका सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत सत्तार म्हणाले, की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर न्यायालयाच्या आदेशानुसार व कायद्यानुसारच निर्णय घेतील. विरोधी पक्षाने त्यांना उगाच सूचना देऊ नयेत. संजय राऊत यांनी टेस्ला कंपनीबाबत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, की राज्याच्या हितासाठी काम करणार्‍या कोणत्याही कंपन्यांना जागा देऊ. टेस्ला येत असेल तर त्यांनाही जागा देण्यास आम्ही सक्षम आहोत. कोणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये.

सत्तार यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही टीका केली. जे पद मिळाले ते मुख्यमंत्री शिंदे यांचीच कृपा असल्याचे दानवे यांनी विसरू नये. शिंदे यांनीच दानवेंना आमदार केले. त्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची लायकी नाही, असे ते म्हणाले. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या मागणीबाबत सत्तार म्हणाले की, खोत हे खरे शेतकरी नेते आहेत. त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल.

‘ काँग्रेस’ आणि कुलगुरू..

विद्यापीठातील कार्यक्रमात परभणीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मणी यांच्या भाषणात ‘इंटरनॅशनल काँग्रेस’ हा शब्द आला. त्यातील ‘काँग्रेस’ शब्दाकडे लक्ष वेधत ‘कुलगुरूंना लोकसभा किंवा विधानसभा लढवायची तर नाही ना?’ अशी टिप्पणी सत्तार यांनी केली, तेव्हा सभागृहात हशा पिकला.

Back to top button