अहमदनगर : सलीम ऊर्फ पाप्या शेख टोळीला ‘मोक्का’ | पुढारी

अहमदनगर : सलीम ऊर्फ पाप्या शेख टोळीला ‘मोक्का’

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना देखील ‘कुरापत्या’ करून साथीदारांच्या मदतीने गुन्हे करणार्‍या सलीम ऊर्फ पाप्या शेख व टोळीवर ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांनी शेख टोळीला ‘मोक्का’ लावण्याचा प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांनी मंजूरी दिली आहे. शेख याच्यावर 37 गुन्हे दाखल असून, टोळीतील साथीदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

सलीम ऊर्फ पाप्या खाँजा शेख (रा.कालीकानगर, शिर्डी, ता.राहाता,जि.अ.नगर) व टोळीतील सदस्य दत्तात्रय सुरेश डहाळे (वय 34, रा. श्रीरामनगर, शिर्डी), सुलतान फत्तेमोहमद शेख (वय 29 रा.महलगल्ली, बेलापूर, ता. श्रीरामपूर), रवी राजेंद्र बनसोडे (वय 22, रा.गायकवाडवस्ती, शिर्डी, ता. राहाता), राहुल सिंग (रा.उमरठी, मध्यप्रदेश), तनवीर मोहमद हानिफ रंगरेज (रा.कोपरगाव, ता.कोपरगाव), गणेशसिंग विठ्ठलसिंग तौर (वय 50, रा.गावडे कॉलनी, चिंचवड पुणे), कुमार जगन्नाथ खेत्री (रा.ताकारी वाळवा, जि.सांगली) अशा 9 आरोपीविरूद्ध ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक न्यायालयाने सलीम ऊर्फ पाप्या शेख याला शिक्षा ठोठावलेली असतल्याने तो सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. कारागृहात शिक्षा भोगत असतानाही पाप्या शेख याने त्याच्या साथीदारांसोबत संपर्क करून नवीन टोळी तयार केली. या टोळीने मध्यप्रदेशातून गावठी कट्टे व जीवंत काडतूसे आणल्याने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सलीम ऊर्फ पाप्या शेख ‘मोक्का’च्या गुन्ह्यात तुरूंगात असताना देखील त्याने टोळी तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या टोळीवर वाढीव कलमानुसार ‘मोक्का’ लावण्याचा प्रस्ताव एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्याकडे पाठवला होता. बी.जी.शेखर यांनी प्रस्तावाला मंजुरी देत सलीम ऊर्फ पाप्या शेख टोळीला वाढीव कलमानुसार ‘मोक्का’ लावला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Back to top button