श्रीरामपूर : अतिवृष्टीच्या भरपाईसाठी काँग्रेसचा ठिय्या | पुढारी

श्रीरामपूर : अतिवृष्टीच्या भरपाईसाठी काँग्रेसचा ठिय्या

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. सततच्या पावसाने उरली सुरलेली पिकेही उद्ध्वस्त झाली होती. मार्च व एप्रिल 2023 मध्ये तालुक्यातील काही भागामध्ये गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अस्मानी संकटाची दखल घेऊन शासनाने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले.

त्यानुसार अ. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुका वगळता अन्य तालुक्यात शेतकर्‍यांना नुकसान भरपाई प्राप्त झाली. मार्च व एप्रिलमधील गारपिटीचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग झाले, तथापि, श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी मात्र नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी थेट तहसील कार्यालय गाठले. अचानक तहसील कार्यालयाचा ताबा घेत तेथे ठिय्या मांडून आंदोलन केले.

दरम्यान, जोपर्यंत नुकसान भरपाई मिळण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत तहसील कार्यालय सोडणार नाही, यशी कठोर भूमिका अशोक (नाना) कानडे व काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी घेताच तहसीलदारांसह कर्मचार्‍यांची चांगलीच धांदल उडाली. आमदार लहू कानडे यांनी नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर कार्यकर्त्यांनी अनेकदा तहसील कार्यालयावर मोर्चे काढले, आंदोलन केले. प्रत्येक आंदोलनावेळी प्रशासनाने आश्वासने देऊन शेतकर्‍यांची बोळवण केली. आज या गोष्टीचा उद्रेक होऊन अचानक आ. कानडे यांचे बंधू अशोक कानडे यांच्यासह काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, विष्णूपंत खंडागळे, राजेंद्र कोकणे, कार्लस साठे, बाबासाहेब कोळसे, अशोक भोसले, सचिन जगताप आदींसह शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकार्‍यांसमोर व्यथांचा पाढा वाचला.

यावेळी अशोक कानडे म्हणाले, खरिपातील अतिवृष्टीची नुकसान भरपाई 15 कोटी व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची नुकसान भरपाई 15 कोटी असे शेतकर्‍यांचे 30 कोटी रुपये व मार्च व एप्रिलमधील गारपिटीमुळे झालेली नुकसान भरपाई शेतकर्‍यांना केव्हा द्याल, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत लेखी द्यावे, अशी आग्रही भूमिका घेतली. तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह आयुक्त कार्यालयाशी संपर्क करून लेखी पत्र देण्याचे कबूल केले.

श्रीरामपूर तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु, शासनाच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात फक्त श्रीरामपूर तालुका नुकसान भरपाई न मिळता वंचित राहिला. यावर आ. कानडे यांनी पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी मोर्चा काढला होता, परंतु नुकसान भरपाई मिळाली नाही.

श्रीरामपूर तालुक्यात शेतकर्‍यांना सापत्न वागणूक शासनाकडून जाणीवपूर्वक मिळते, हे लक्षात आल्याने आज पुन्हा आमदार कानडे यांच्या आदेशाने श्रीरामपूर तालुक्यातील अतिवृष्टीने व सततच्या पावसाने उभ्या पिकांचे, फळे, भाजीपाला, गहू, हरभरा, सोयाबीनचे जे नुकसान झाले त्यांची नुकसान भरपाई त्वरित मिळावी, या मागणीसाठी तहसीलवर मोर्चा काढला.

यावेळी सतीश बोर्डे, अ‍ॅड. मधुकर भोसले, बाबासाहेब कोळसे, नानासाहेब रेवाळे, अशोकचे माजी संचालक बाळासाहेब तनपुरे, नायगावचे सरपंच डॉ. रा. ना. राशीनकर, सचिन जगताप, आबा पवार, राजेंद्र कोकणे, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, योगेश आसने, विलासराव शेजूळ, रमेश आव्हाड, आशिष शिंदे, अजिंक्य उंडे, अमोल आदिक, नीलेश आदिक, तुषार दाभाडे, सुबोध माने, बाबासाहेब लोखंडे, सुनील कवडे, संदीप दांगट, चंद्रभान वाघ, ज्ञानेश्वर धनवटे, प्रशांत कवडे, दगडू उंडे, अनिल रोकडे, रामकृष्ण उंडे, अण्णासाहेब ढोणे, इसाक शेख, युनूस पटेल,निखिल कांबळे, अक्षय नाईक, विलास दरेकर, गणेश कांबळे आदी उपस्थित होते.
लेखी आश्वासनानंतर बाळासाहेब कोळसे यांनी आभार माणून शेतकर्‍यांची अवस्था या चारोळीने आंदोलन मागे घेतले.

कानडे यांनी तहसीलदारांना धरले धारेवर..!

मोर्चानंतर जिल्हाधिकारी व महसूल उपसचिव यांच्याशी तहसीलदारांनी दूरध्वनीवरून चर्चा करून मोर्चेकर्‍यांना ठोस आश्वासन दिले. अशोक (नाना) कानडे यांनी 15 दिवस थांबू. वाट पाहू, नंतर पुढचे पाऊल उचलू, असे शेतकर्‍यांना सांगितले. त्यामुळे मोर्चातील शेतकरी शांत झाले. यावेळी कानडे यांनी तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरले. मदतीपासून वंचित राहत असेल तर शेतकर्‍यांचा संयम तुटेल. तहसील कार्यालय बंद पाडू, असा इशारा देताच 15 दिवसांत नुकसान भरपाई देण्याचे तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिले.

Back to top button