संगमनेर : विधवेवर अत्याचार; 30 लाख रुपयांची फसवणूक | पुढारी

संगमनेर : विधवेवर अत्याचार; 30 लाख रुपयांची फसवणूक

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून वेळोवेळी तिच्याकडून सुमारे 30 लाख रुपये घेतले. रक्कम परत देण्यास नकार देत विधवेच्या मुलीस मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सप्टेंबर (2020 ते 1 मे 2023) या काळात संगमनेर व शिर्डीमध्ये झालेल्या अत्याचारासंदर्भात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून योगेश सुभाष टोपेकर (आळंदी. जि. पुणे) याच्या विरोधात अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश टोपेकर याची कोविड काळात फेसबुकवर पीडितेची ओळख झाली होती.

या संभाषणातून ती विधवा असल्याची माहिती टोपेकर याला मिळाली. त्याने महिलेशी वेळोवेळी फोनवरून संपर्क साधत तिच्याशी जवळीक वाढविली. त्याचे या महिलेच्या घरी येणे- जाणे सुरू झाले. ‘तुझ्याबरोबर लग्न करतो,’ असे आमिष दाखवत त्याने तिच्या इच्छेविरुद्ध घरी व शिर्डीत हॉटेलमध्ये वारंवार अत्याचार केले.

दरम्यान त्याने तिच्याकडून 30 लाख 37 हजार 79 रुपये फोन पे, गुगल पेद्वारे ऑनलाईन घेतले. पीडितने त्याला वेळोवेळी रक्कम दिली. या पैशाची मागणी केली असता त्याने, ‘मी तुझ्यासोबत लग्न करतो. पैशाबद्दल बोलू नको. नाहीतर तुझ्या मुलीस मारून टाकेल,’ असा दम पीडितेला दिला. सपोनि राजेंद्र पवार तपास करीत आहे.

Back to top button