अग्निवीर भरतीचे बनावट कॉल लेटर; अहमदनगरमध्ये लष्करी अधिकार्‍यांनी चौघांना पकडले | पुढारी

अग्निवीर भरतीचे बनावट कॉल लेटर; अहमदनगरमध्ये लष्करी अधिकार्‍यांनी चौघांना पकडले

नगर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून भरती झाल्याचे बनावट कॉल लेटर घेऊन नगरमधील लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या चौघा तरूणांना लष्कराच्या अधिकार्‍यांनी पकडले आहे. या चौघांसह त्यांना बनावट कॉल लेटर तयार करून देणारे दोघे, अशा सहा जणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुभेदार शिवाजी रामदास काळे (आयटी बटालियन एमआयसी अ‍ॅण्ड एस, सोलापूर रोड, नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आमच्या बटालियनमध्ये देशभरात अग्निवीर म्हणून भरती झालेले युवक प्रशिक्षणासाठी येत असतात. त्यानुसार मंगळवारी (दि.23) रात्री 10 च्या सुमारास उत्तरप्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील आदर्श नांगेलाल कुशावह (वय 19), मोहितकुमार माणिकलाल यादव (वय 25), आनंद शाम नारायण शर्मा (वय 23), अंशु राजेंद्रकुमार पटेल (वय 20) हे चौघेजण त्यांच्या नावाचे कॉललेटर घेऊन एमआयसी अ‍ॅण्ड एस सोलापूर रोड दरेवाडीचे गेट नं.3 वर आले.

त्यांची कागदपत्रे बटालियनचे आर.पी. हवालदार तलविंदरसिंह यांनी तपासली असता, त्यांच्या कॉल लेटरवर कर्नल विजयसिंह (ए.आर.ओ. मेरठ) असे नाव व सही होती. मात्र, एआरओ सेंटरचा शिक्का नव्हता. त्यामुळे हवालदार तलविंदरसिंह यांना शंका आली व त्यांनी बटालियनचे सुभेदार मेजर सत्यवीर सिंह, मेजर राजपूत यांना या चारही मुलांचे कॉललेटर बनावट असल्याच रिपोर्ट दिला. त्यानंतर चौघांना बुधवारी (दि.24) सकाळी 8.30 वाजता आयटी बटालियनचे मेजर संजया बिष्णोई यांच्या कार्यालयात हजर करण्यात आले.

त्यांनी उत्तरप्रदेशातील मेरठचे एआरओ यांच्याकडे या चार जणांच्या भरतीबाबत चौकशी केली असता, तेथे या नावाचे कोणीही भरती झाले नसल्याचे आढळून आले. तसेच, अग्निवीरमध्ये भरती झालेल्या मुलांची माहिती असलेल्या आसान अ‍ॅपवर तपासणी केली असता, तेथेही त्यांची नावे आढळून आली नाहीत. त्यामुळे सदर कॉललेटर बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यावर लष्करी अधिकार्‍यांनी त्या चौघांकडे हे कॉललेटर कोणी तयार करून दिले याची चौकशी केली.

त्यावेळी सदर कॉल लेटर लोकेशकुमार तेजपालसिंग राजपूत व गोपाल रामकिशन चौधरी (दोघे रा.उत्तर प्रदेश) यांनी आम्हाला बनवून दिलेले असून, ते दोघे नगरमध्ये असल्याची माहिती लष्करी अधिकार्‍यांना दिली. या चौघांनी तसेच त्यांना बनावट कॉललेटर बनवून देणार्‍या दोघांनी खोटी कागदपत्रे तयार करून, लष्कराची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सुभेदार शिवाजी काळे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button