समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा झाला पूर्ण, शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या मार्गाचे 26 मे रोजी होणार लोकार्पण | पुढारी

समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा झाला पूर्ण, शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या मार्गाचे 26 मे रोजी होणार लोकार्पण

कोपरगाव (नगर), पुढारी वृत्तसेवा: शिर्डी ते नागपूर या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यानंतर 26 मे रोजी शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जोरदार तयारी सुरू आहे. कोकमठाण शिवारात महामार्ग मोठा मंडप टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला. या मार्गावार 120 किमी प्रतितास वेगाने वाहन चालवण्याची परवानगी असल्याने नागपूर ते शिर्डी हे अंतर पाच तासांत पार करता येते. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍यांची संख्या वाढली आहे.

पहिल्या टप्प्यानंतर महामंडळाने शिर्डी ते भरवीर टप्प्यावर लक्ष केंद्रित केले होते. हा टप्पा 180 किमीचा असून सर्व कामे पूर्ण झाली आहेत. 26 मे रोजी या मार्गाचे लोकार्पण होईल, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. हा टप्पाही वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर नागपूर ते भरवीर असा एकूण मिळून 600 किमीचा मार्ग वाहतुकीसाठी वापरात येईल.

शिर्डी- भरवीर टप्पा पूर्ण झाल्यामुळे नागपूर ते नाशिक प्रवास पाच ते साडेपाच तासात पूर्ण करणे शक्य होईल. शिर्डी ते भरवीरनंतर जुलै महिन्यापर्यंत भरवीर ते इगतपुरी टप्पा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रवास आणखी वेगवान होईल.

हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या 80 किलोमीटर लांबीच्या दुसर्‍या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते 26 मे 2023 रोजी कोकमठाण येथील शिर्डी इंटरचेंज येथून होत आहे. यामुळे नाशिक-मुंबई-पुणे हा विकासाचा सुवर्ण त्रिकोण उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील 10 जिल्ह्याशी थेट व 14 जिल्ह्यांशी अप्रत्यक्ष जोडला जाणार आहे. समृध्दी महामार्गावरील सर्वात मोठा सिन्नर इंटरचेंजमुळे शिर्डी, अहमदनगर, नाशिक व पर्यायाने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. एका अर्थाने विकासाच्या सुवर्ण त्रिकोणाला जोडणारी ही महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे. प्रकल्पाच्या या दुसर्‍या टप्प्याचा खर्च 3200 कोटी रुपये असून लांबी 80 कि मी आहे. या टप्याच्या उद्घाटनानंतर 701 कि.मी पैकी आता एकूण 600 कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध होणार आहे.

या दुसर्‍या टप्यात सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होईल. भरवीर इंटरचेजपासून घोटी (ता. इगतपुरी) हे अंदाजे 17 कि.मी अंतरावर आहे. या इंटरचेंजपासून नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे जाणार्‍या भाविकांचा प्रवास जलद होईल. तसेच भरवीर ह्या इंटरचेंजपासून एस.एम.बी.टी रुग्णालय अत्यंत जवळ (500 मीटर अंतरावर) आहे. शिर्डीपासून ह्या रुग्णालयापर्यंत एक तासाच्या आत पोहचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येण्यासाठी कमी कालावधी लागेल. हा मार्ग सुरू झाल्याने प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

तीन इंटरचेंज तर 56 टोल बूथ

समृद्धी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्यात 7 मोठे पूल, 18 छोटे पूल, वाहनांसाठी 30 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, 3 पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, 56 टोल बूथ, 6 वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे.

शिर्डीच्या विकासाला मिळणार बुस्टर डोस

समृद्धी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी 29.40 किलोमीटर
असून कोपरगाव इंटरचेंज पासून शिर्डी 10 किलोमीटर आहे. अहमदनगर मुख्यालयाचे अंतर 110 किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गालगत जिल्ह्यात 2 कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामुळे शिर्डी व अहमदनगर परिसरातील कृषी, उद्योग व व्यवसायाला चालना मिळून रोजगार वाढणार आहे. समृद्धीमुळे शिर्डीत देशविदेशातून येणार्‍या भाविकांची संख्या ही वाढणार आहे. शिर्डी व परिसराच्या विकासाला बूस्ट मिळणार आहे.

Back to top button