कपाशी बियाण्यांचा होतोय काळाबाजार, राहुरी तालुक्यातील कृषी केंद्रचालकांकडून आर्थिक लूट; शेतकर्‍यांमध्ये नाराजी | पुढारी

कपाशी बियाण्यांचा होतोय काळाबाजार, राहुरी तालुक्यातील कृषी केंद्रचालकांकडून आर्थिक लूट; शेतकर्‍यांमध्ये नाराजी

उंबरे (नगर), पुढारी वृत्तसेवा: राहुरी तालुक्यामध्ये कपाशी बियाणांचा कृषी सेवा केंद्र व कंपनी डीलरकडून मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कृषी सेवा केंद्र तसेच इतर दुकानांमधून कपाशी बियाणाची बॅग 853 रुपयांना मिळते. आज मात्र काळ्या बाजाराने 1200 ते 1500 रुपयाला विकली जात आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे एक जून पासून कपाशी बियाणे विक्री परवानगी आहे. परंतु कृषी सेवा केंद्र व इतर ठिकाणी अगोदरच कपाशी बियाणे उपलब्ध झाले आहेत.

शासनाच्या नियमाचा हवाला देऊन हे कृषी सेवा केंद्र चालक शेतकर्‍यांकडून किमतीपेक्षा जास्त पैसे घेत आहेत. कपाशी बॅग शेतकर्‍यांनी घेतल्यानंतर त्यांना बिलही दिले जात नाही. काही कृषी सेवा केंद्र चालक तर बिलावर जून महिन्यातील तारीख टाकून देतात.

गेल्या दोन वर्षापासून कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी पूर्णपणे मे मेटाकुटीला आला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे कपाशीचे पीक पूर्ण वाया गेले होते. त्याचे पंचनामे होऊनही अद्यापि कुठलीही मदत शेतकर्‍यांना मिळाली नाही. यावर्षी तरी वरूण राजाची कृपा होऊन चांगले पीक येईल, ही आशा करत आहे. लवकर जर कपाशीची लागवड झाली तर दिवाळीच्या आत चार पैसे हातात येतील व दिवाळी गोड होईल, हिच अशा शेतकर्‍यांना असते. परंतु कृषी सेवा केंद्र व इतर बियाणे विक्रेत्यांकडून याच गोष्टीचा फायदा घेऊन शेतकर्‍यांना लुबाडण्याचे काम सुरू आहे.

शेतकर्‍यांचे नगदी पीक म्हणून कपाशी या पिकाकडे बघितले जाते. मागील वर्षी चांगला पाऊस झाला. शेतकर्‍यांच्या विहिरींना भरपूर पाणी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची पहिली पसंती ही कपाशीची आहे. शेतकर्‍याचे नगदी पीक म्हणून कपाशीकडे बघितले जाते. परंतु आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी कृषी सेवा केंद्र कडून आणखीन लुबाडला जात आहे. शासनाने याची दखल घेऊन संबंधित जादा दराने कपाशी बियाणे विकणार्‍या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करावी, अशीच मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. याबाबत कृषी अधिकार्‍यांनी लक्ष घालावे.

संबंधित कृषी चालकांचा बंदोबस्त करावा

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना अद्यापि कोणतीही मदत सरकारने दिलेली नसताना त्यात शेतकर्‍यांना कृषी सेवा केंद्र चालक लुटत आहेत. त्यांचा शासनाने बंदोबस्त केला पाहिजे. नाहीतर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. त्याचबरोबर संबंधित दुकानदारांचे लायसन रद्द करण्यासाठी अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांनी दिला आहे.

‘त्या’ कृषी चालकांचे लायसन्स रद्द करा

गेल्या दोन वर्षापासून कांद्याला भाव नसल्याने शेतकर्‍यांना उभ्या पिकामध्ये नांगर घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे बरबाद झाला आहे. त्यात शेतकर्‍यांना लुटण्याचे काम हे कृषी सेवा केंद्र चालक करत असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी व जे कोणी दोषी आढळले असतील त्यांचे लायसन्स रद्द करून शेतकर्‍यांचे लुटलेले पैसे त्यांना परत मिळावे. अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने राहुरी येथे मोठे आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश लांबे यांनी दिला.

Back to top button