कर्जत : कुकडीच्या आवर्तनाची शेतकर्‍यांना प्रतीक्षा | पुढारी

कर्जत : कुकडीच्या आवर्तनाची शेतकर्‍यांना प्रतीक्षा

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कुकडीचे उन्हाळी आवर्तन 22 तारखेला सोडण्याचा निर्णय पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र अजूनही आवर्तन सुटले नाही. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पुणे येथील सिंचन भवनात कुकडी कालवा सल्लागार समितीची आवर्तन सोडण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यासह काही आमदार व सदस्य व पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये धरणामध्ये उपलब्ध असणारे पाणी, फिडिंग करून यावे लागणारे पाणी, त्यासाठी लागणारा कालावधी याबाबत सविस्तर चर्चा झाली होती. या नियोजनानुसार 22 तारखेला आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र अद्याप आवर्तन का सुटले नाही, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे.

कुकडीचे उन्हाळी आवर्तन पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या चारही तालुक्यांतील शेतकर्‍यांसाठी उपयुक्त आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विहीर व तलावांतील पाणी आटले आहे. यामुळे पिकांना व फळबागांना पाण्याची अत्यंत गरज आहे. पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी कुकडीच्या आवर्तनाची चातकासाठी प्रतीक्षा करत आहेत.

Back to top button