नगर: खरिपाच्या नियोजनाची शेतकर्‍यांना चिंता: रब्बीचे कर्ज, उसनवारी देणे बाकी; अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा | पुढारी

नगर: खरिपाच्या नियोजनाची शेतकर्‍यांना चिंता: रब्बीचे कर्ज, उसनवारी देणे बाकी; अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा

नेवासा, पुढारी वृत्तसेवा: गेल्या हंगामातील नैसर्गिक आपत्तीसह विविध संकटांचा सामना शेतकरी सध्या करत आहेत. उधार उसनवारी करून रब्बीचा हंगाम गेला तरी शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा करीत आहे. अगोदरचेच कर्ज, उधारी, उसनवारी देणे बाकी आहे. यातच नवीन हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. खरीप हंगामाची शेतकरी तयारी करीत असला तरी, त्याच्या नियोजनाची चिंता सतावत आहे. त्यांनी आर्थिक खर्चाची धास्ती घेतली आहे.

नेवासा तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. खरीप हंगामापूर्वीच्या शेती मशागतीचे काम सध्या वेगात सुरू झाले आहे. मात्र, ऐन खरिपाच्या तोंडावर बळीराजासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिलेला आहे. गेल्या हंगामात बियाणे, खते, औषधांच्या दरवाढीची झळ शेतकर्‍यांना बसली होती. या हंगामातही खर्चवाढीचे संकेत असल्याने या हंगामातही उत्पन्न वाढीऐवजी मजुरीसह खर्च वाढीचीच धास्ती शेतकर्‍यांमध्ये दिसत आहे.

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर, शिरसगाव, खडका, प्रवरासंगम, पाचेगाव, बेलपिंपळगाव, पुनतगाव, गोणेगाव, मुकिंदपूर, घोडेगाव आदी बहुतांश भागात सध्या खरीप हंगामाची तयारी शेतकर्‍यांनी हाती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेताची पेरणीपूर्व मशागत करणे हातचा विषय असला तरी, खते, बी- बियाणे, मजूर, शेती पूर्वीसारखी राहिलेली नाही. पीक घरात येईपर्यंत नाही तर, बाजारात विक्री होईपर्यंत नफा मिळेल की नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. सरकारी घोषणांची अंमलबजावणीही अतिशय धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे पेरणीचा किंवा पिकांना खते देण्याचा कालावधी निघून गेल्यावर मिळणार्‍या मदतीला अर्थ उरत नाही.

यासाठी अगोदर पैशांची व्यवस्था करावी लागते. हे करताना पेरणीचा कालावधी चुकू द्यावा लागत नाही. अन्यथा उत्पन्नात घट येते. अवकाळीने कांदा, गहू, हरभरा, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. उरलासुरला माल विक्रीस न्यावा, तर हमीभाव नसलेल्या या पिकांचे बाजारभावही खर्च मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे साठवणूक केल्याशिवाय पर्याय नाही. साठवणूक करण्यासाठीही खर्च येत आहे. अशा अवस्थेत अगोदरचेच कर्ज, उधारी, उसनवारी देणे बाकी आहे. यातच नवीन हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. मजुरीचे दर वाढले आहेत. इंधन दरवाढीने यंत्र मशागत महागली आहे. अशावेळी सरकार म्हणून राजकारणी मंडळी आपुलकीने म्हणा किंवा मतांसाठी म्हणा, दोन घोषणा करतात. मात्र, त्याला डेडलाईन नसते. त्यामुळे या घोषणांच्या अंमलबजावणीबाबतची शाश्वती आता शेतकर्‍यांना राहिलेली नाही. अवकाळीच्या नुकसानीची भरपाई तत्काळ शेतकर्‍यांच्या पदरात पडली, तर कुठं खरीप हंगामाच्या तयारीला हातभार लागेल. जगाचा पोशिंदा बळीराजा जगावा, खरिपाच्या स्वागताला उभा रहावा, ही बाब सरकारी ध्येयधोरणांच्या केंद्रस्थानी असायला हवी, अशीच भावना युवा शेतकरी व्यक्त करत आहेत.

सध्या शेतकरी खरिपाची तयारी करीत असताना खरिपात कोणते पीक घ्यावे, कपाशी करावी की सोयाबीन करावे? अशा वेगवेगळ्या चर्चा करताना शेतकरी दिसत आहेत. कांद्याने यावर्षी दगा दिला, शेतकर्‍यांची वाट लावली. मातीमोल भावाने कांदा व्यापार्‍यांना द्यावा लागत आहे. कांदा गेला आता कपाशी तरी हातभार लावेल, या भरवशावरच कपाशीची लागवड वाढण्याची शक्यता आहे. खरिपातील नियोजनात शेतकरी गुरफटला असला तरी, आर्थिक समस्या त्यांच्या समोर आहेत.

नैसर्गिक आपत्तीसमोर कांदा टिकला नाही. राहिलेल्या कांद्याला भाव नाही. रब्बीत गहू, कांद्याने वाटोळे झाले. फळबागांच्या नुकसानीकडे शासनाने दुर्लक्ष केले. शेतकर्‍यांचे आता कपाशीकडे लक्ष लागले आहे.
– रंगनाथ शेजूळ, शेतकरी, गोंडेगाव, ता. नेवासा

Back to top button