नगर: पाथर्डी शहरात अतिक्रमणांवर हातोडा | पुढारी

नगर: पाथर्डी शहरात अतिक्रमणांवर हातोडा

पाथर्डी (नगर), पुढारी वृत्तसेवा: पाथर्डी शहरातील रहदारीला, तसेच विकासकामांना अडथळा ठरणारी अतिक्रमणे मंगळवारी (दि.23) नगरपरिषदेने काढण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवस ही मोहीम सुरू असणार असून टप्प्याटप्प्याने अतिक्रमणे काढली जाणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अतिक्रमणे काढल्यामुळे नाईक चौक ते उपजिल्हा रुग्णालय, तसेच कोरडगाव रस्त्यावरील नाईक चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतचा रस्ता दिसत होता. त्यामुळे खर्‍या अर्थाने शहरवासियांनी मोकळा श्वास घेतला असल्याचे नागरिक बोलत होते.

पालिका प्रशासनाने अतिक्रमण धारकांना यापूर्वीच नोटिसा दिल्या होत्या. परंतु, पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने अतिक्रमणे काढण्यात आली नव्हती. मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास पालिका कर्मचार्‍यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह चार जेसीबी मशीन, अतिक्रमणाचा मलवा टाकण्यासाठी वाहने, असा लवाजमा घेतला. पाथर्डी शहराच्या प्रमुख रस्त्यांवर उतरून अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. अतिक्रमणे काढण्यासाठी कर्मचारी आल्याचे कळताच संबंधितांनी नुकसान होऊ नये, म्हणून स्वत:च आपल्या टपर्‍या काढून घेतल्या.

शहरातील अजंठा चौकात वीर सावरकर मैदानाकडे जाणार्‍या मार्गावर असलेले नगरपरिषदेचे भाडे तत्त्वावरील गाळे रिकामे करण्याचे आदेश मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी व्यावसायिकांना दिले. त्यावेळी येथील व्यावसायिक म्हणाले की, आम्ही गेल्या 30 वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करतोय. ग्रामपंचायत असल्यापासून येथे आमचा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे आम्ही अतिक्रमण धारक नाहीत. आम्ही नगरपरिषदेचे भाडेकरू आहेत. भाडेपट्टीसह इतर कर भरत आहोत. त्यामुळे आम्हाला येथून हटविण्याचा संबंध येत नाही. आम्हाला येथून हटवायचे असेल तर, आमच्या कुटुंबातील महिलांसह मुलाबाळांचे जीव घ्या आणि मग आमच्या दुकानावर जेसीबी चालवा, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथील व्यावसायिकांच्या कुटुंबातील महिला, मुले आपल्या दुकानासमोर उभे ठाकले. आमच्यावर पहिला जेसीबी चालवा, आमचा जीव घ्या, मगच आमची दुकाने खाली करा, असा इशारा त्यांनी अधिकार्‍यांना दिला.

मुख्याधिकारी संतोष लांडगे, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी आयुब सय्यद, कर निरीक्षक सोमनाथ गर्जे, महेश कवादे, लक्ष्मण हाडके, सोमनाथ धरम, रवींद्र बर्डे, पंकज पगारे, दत्तात्रय ढवळे आदी मोहिमेत सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळी जुन्या बसस्थानकापासून उपजिल्हा रुग्णालयापर्यंत, तसेच कोरडगाव रस्ता ते नाईक चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत दोन्ही बाजूंची अतिक्रमणे काढण्यात आली. या दोन्ही रस्त्यावरून जाताना व येताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. तशीच परिस्थिती कोरडगाव रस्त्याची होती. या दोन्ही रस्त्यांवरील अतिक्रमणे काढल्याने जुने बसस्थानक परिसर मोकळा दिसू लागला आहे.

पाथर्डी नगरपरिषदेकडून ही अतिक्रमण हटाव मोहीम पुढील काही दिवस चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले. या जागेवर पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, याची खबरदारी पाथर्डी नगरपरिषद प्रशासनाने घ्यावी, असा सूर आता नागरिकांमधून उमटत आहे.

मोहीम थांबविण्याची मागणी

अजंठा चौकातील नगरपरिषदेचे भाडे तत्त्वावरील गाळे पाडण्यासाठी कोणाचा दबाव आहे? या चौकातील खरेदी-विक्री संघाची इमारतही बेकायदेशीर आहे. शेवगाव रस्त्यावरील शासकीय जागेवरील, तसेच इतर अतिक्रमणे काढण्याची अधिकार्‍यांची हिंमत का होत नाही? अतिक्रमणे काढण्यास विरोध नाही. मात्र, नगरपरिषदेने छोट्या व्यावसायिकांना पर्यायी जागा दिल्या पाहिजेत, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता हल्ला चढविला. मोहिमेच्या विरोधात ढाकणे व व्यावसायिकांनी प्रांताधिकारी प्रसाद मते यांना निवेदन देत मोहीम थांबविण्याची मागणी केली.

Back to top button