उद्घाटन सवडीने करा, आधी दुष्काळी भागाला पाणी द्या; बाळासाहेब थोरात यांचे सरकारला खरमरीत पत्र

उद्घाटन सवडीने करा, आधी दुष्काळी भागाला पाणी द्या; बाळासाहेब थोरात यांचे सरकारला खरमरीत पत्र
Published on
Updated on

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील 182 गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण झाले आहे. तसेच कालव्यांची कामे अनेक अडचणीवर मात करून पूर्ण केली आहेत. मात्र, फक्त श्रेयवादासाठी दुष्काळी जनतेला वेठीस धरले जात आहे. नवीन कालव्यांमधून दुष्काळी भागातील जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा. वेळ मिळेल तेव्हा उद्घाटन करा, असे खरमरीत पत्र काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आपले लक्ष वेधू इच्छित असून दुष्काळी भागाला नजरेसमोर ठेवून निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम करण्यात आलेले आहे. सध्या निळवंडे व भंडारदरा धरणातून किमान दहा टीएमसी पाणी दुष्काळी भागाला देऊ शकतो. मात्र, केवळ पंतप्रधान महोदयांची उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही म्हणून या हक्काच्या पाण्यापासून दुष्काळी भागातील जनता वंचित राहिलेली आहे.

निळवंडे धरण आणि डाव्या कालव्याचे काम यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. आपले सरकार आल्यानंतर उजव्या कालव्याचे काम रखडलेले आहे, त्याला अपेक्षित गती मिळताना दिसत नाही. उन्हाळा सुरू झालेला आहे, शिवाय मान्सूनला आता अल निनोचा धोका आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सरकारलाही या भविष्यकालीन दुष्काळाची तीव्रता माहित आहे, त्यामुळे दुष्काळी भागाचे हक्काचे दहा टीएमसी पाणी लाभक्षेत्रातील बांधवांना मिळणे अत्यावश्यक आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर या पाण्याचा दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांना उपयोग होणार नाही. सरकारने तातडीने दुष्काळी भागाला पाणी द्यावे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना माहीत आहे. धरणांमध्ये पाणी असतानाही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, त्यामुळे जनतेच्या मनात सरकार बद्दल प्रचंड रोष आहे. जनतेच्या मनातली ही भावना आपण समजून घ्यावी. हवे तर नंतर सवडीनुसार आदरणीय पंतप्रधानांना बोलवावे, उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम करावा. त्याला आमची अजिबात हरकत नाही. मात्र, हक्काचे दहा टीएमसी पाणी हे त्वरित दुष्काळी भागातील जनतेला देण्याचे पुण्यकर्म आपण करावे, अशी मागणी दुष्काळी भागातील तमाम शेतकरी बांधव, नागरिक व महिला यांच्या वतीने सरकारकडे करत असल्याचे थोरात यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

दुष्काळी भागातील जनतेला पाणी मिळावे म्हणून निळवंडे धरण पूर्ण केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कालव्यांसाठी मोठा निधी मिळवून ऑक्टोबर 2022 मध्ये पाणी देण्यासाठी रात्रंदिवस युद्ध पातळीवर काम सुरू होते. मात्र, राज्यात सरकार बदलले आणि कालव्यांच्या कामांची गती मंदावली आहे. यामुळे दुष्काळी भागात तीव्र संताप निर्माण झाला असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news