आपुलकीच्या नात्याला क्षुल्लक कारणांची झळ, शांतताप्रिय शेवगाव पेटविणारे झाले पसार अन् पेटलेले जेलमध्ये | पुढारी

आपुलकीच्या नात्याला क्षुल्लक कारणांची झळ, शांतताप्रिय शेवगाव पेटविणारे झाले पसार अन् पेटलेले जेलमध्ये

रमेश चौधरी

शेवगाव (नगर): किरकोळ कारणावरून झालेल्या दगडफेक व दंगलीच्या घटनेमुळे शांतताप्रिय शेवगावची ओळख पुसली गेली. दंगलीतून कोणाला काय साध्य करायचे होते, याचे उत्तर अद्यापि मिळाले नसले तरी पेटवणारे पसार झाले आणि पेटलेले जेलात गेले. अपप्रवृत्तीवर वेळीच उपाय करण्यात पोलिसांना अपयश आल्याने ,गत चार महिन्यापासून शहरातील धूसफूस दंगलीच्या घटनेपर्यंत घेऊन गेली आहे. दंगल घडवून आणणारे नामानिराळेच राहिले पण गांभीर्य नसलेल्या हुल्लडबाज अल्पवयीन मुलांना व तरुणांना मात्र नाहक तुरुंगात अडकून पडण्याची वेळ आली.

शांतताप्रिय बाजारपेठेचे शहर अशी शेवगावची वर्षानुवर्षांची ओळख आहे. सर्व जातीधर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. मात्र विविध संघटनेतून उदयाला आलेले नवनेते पाठीराखे जमा करून जातीपातीचा रंग उडवू लागल्याची शंका आता निर्माण होऊ पाहते आहे. महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या व धार्मिक उत्सव साजरे करताना स्वतःची ओळख करून त्यावरच हे नवनेते गुजरान करू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आंदोलन, उत्सव, मिरवणुका याला तर सीमाच राहिली नाही. यासाठी क्रांती चौक हक्काचे व्यासपीठ झाले. डीजे कर्कश वाजू लागले. सर्व रस्त्याच्या दुतर्फा झेंडे, पताका शहराला विद्रुप करू लागले. रंगारंगाचे झेंडे, ते लावण्याची जागा, उंची यावरून कुरबुरी सुरू झाल्या. त्यातूनच वाद, जिरवाजिरव, शक्तीप्रदर्शन सुरू झाले. झेंड्याचे कापड जाऊन उरलेल्या काठ्या वेगळीच कारणे शोधू लागल्या. ‘गावची जत्रा पुढारी सतरा’ असे शेवगावचे पालटलेले चित्र गेल्या काही महिन्यापासून धोक्याचा इशारा घंटा वाजविणारे ठरू पाहते आहे. पोलिसांनी यावर वेळीच गांभीर्याने लक्ष दिले नाही, हे वास्तव. यामागील प्रवृत्तीचा, कारणांचा शोध घेऊन त्यांना वेळीच आवर घालण्यात पोलिस यंत्रणेला महत्त्वाचे वाटले नाही. त्यामुळे प्रत्येक धार्मिक उत्सवात, मिरवणुकीत हुल्लडबाजी, अश्लील शेरेबाजी करून एकमेकांची खुन्नस काढण्यापर्यंत मजल पोहचली.

त्याची परिणिती 14 मे रोजीच्या दंगलीत झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अनेक दिवसांची जातीय खदखद बाहेर आली. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावायचा, या तयारीत असलेल्यांना ही संधी आयती चालून आली. सूत्रधार तरुणांची माथी भडकविण्यात यशस्वी झाले. एकमेकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते जातीधर्माच्या भिंतीमुळे दुष्मनीत कधी बदलले कोणाला कळलेही नाही. कुणी मतासाठी तर कुणी स्वार्थासाठी जातीपातीचा बेमालूमपणे वापर केला. यात काही हुड बुद्धीची पिढी बरबादीच्या मार्गावर गेली. राम-रहीम एकच म्हणणारे शांततेचे आवाहन करण्यास विसरले. सार्वजनिक उत्सव आले की व्यापारी दिसतात आणि एकमेकांच्या वादात त्यांच्याच काचा फुटतात, हा कोणता न्याय. दंगलीनंतर शहराचे व्यवहार पूर्वपदावर आले, मात्र भीतीने मनात घर केले. रात्रीच्या वेळी फिरणार्‍या पोलिस वाहनाकडे अनेकांच्या संशयीत नजरा झाल्या. त्या धाकाने काहींना घर सोडावे लागले. इतरवेळी एकमेकांना मदत करणारी मने अचानकपणे कोण जाणे कशासाठी बदलली. दीपावली-ईदला मनापासून शुभेच्छांच्या मिठी मारणार्‍या हातात एकमेकांसाठी काठ्या का आल्या?, याचे उत्तर कुणाकडे कुणालाच गवसत नाही.

माझ्या गावात, शहरात राहणारा व्यक्ती माझा भाऊ आहे, अशी खात्री असणार्‍या महिलांना आज असुरक्षितता सतावते आहे. शाळेतील मुला मुलींची नजर सुरक्षा शोधताना कावरीबावरी झाली आहे. शेवगाव सुरक्षित स्थळ मानून आलेले नोकरदार आता शहर सोडण्याच्या मनस्थितीपर्यंत पोहचले आहे. माथे भडकविणारे बाजूला गेले मात्र, ज्यांचे माथे भडकले त्यांच्यावर आज पश्चतापाची वेळ आली हे नक्की. जातीपातीच्या नावाखाली राजकीय पोळी भाजू पाहणार्‍यांना भविष्यात आपापसात मतभेद होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. तरच शेवगाव सुरक्षित असल्याचा संदेश अनेकांच्या मनात पुन्हा एकदा घर करेल!

Back to top button