जामखेड पाणीयोजना फेरनिविदांच्या फेर्‍यात! दुसर्‍यांदा मागविली निविदा; एजन्सी निश्चित होईना | पुढारी

जामखेड पाणीयोजना फेरनिविदांच्या फेर्‍यात! दुसर्‍यांदा मागविली निविदा; एजन्सी निश्चित होईना

जामखेड (नगर), पुढारी वृत्तसेवा: जामखेड शहरासाठी वरदान ठरणारी ‘उजनी लाभक्षेत्रातील नळ पाणीपुरवठा योजना’ मंजुरीच्या सहा महिन्यानंतरही निविदा प्रक्रियेच्या पुढे ढकललेली नाही. दुसर्‍यांदा निविदा निघाली मात्र, एजन्सी निश्चित झालेली नाही. त्यामुळे ही योजना जामखेडकरांसाठी ‘मृगजळ’ तर ठरणार नाही ना? अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

आ. राम शिंदे आणि आ. रोहित पवार या दोघांनीही लक्ष घालावे आणि योजनेच्या मंजुरी संदर्भात जसा दोन्ही बाजूने ‘श्रेयवाद’ झाला, तसा एजन्सी निश्चिती करिता व प्रत्यक्ष योजनेच्या कामास सुरुवातीकरीता व्हावा, अशी सर्वसामान्य जामखेडकरांची अपेक्षा आहे. ही योजना झाली तर जामखेडकरांची भविष्यातील पिण्याच्या पाण्याची खूप मोठी अडचण कमी होईल अन्यथा ‘बे चे पाढे’ पुढेही असेच सुरू राहतील.

पुढील 30 वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन दररोज दरडोई 135 लिटर्स या मापदंडाप्रमाणे पाणीपुरवठा करता यावा याकरिता उजनीच्या लाभक्षेत्रातून मंजूर असलेली जामखेडची नळ पाणीपुरवठा योजना फेरनिविदाच्या फेर्‍यांत अडकली असून सहा महिन्यांत दुसर्‍यांदा निविदा निघाली आहे. मात्र कोणतीच एजन्सी काम घेण्यासाठी पुढे यायला तयार नाही. आणखी किती वेळा फेरनिविदा आणि किती दिवस योजनेची प्रतीक्षा? जामखेडकरांना करावी लागणार, हे अनुत्तरीतच आहे.

‘जामखेड’ ग्रामपंचायत असताना जामखेड गाव व 7 वाड्यांकरिता भुतवडा तलावावरून 48 वर्षापूर्वी 1974 मध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. सद्यस्थितीत शहरास काही प्रमाणात त्याचा पाणीपुरवठा सुरू आहे. तथापि त्यानंतर शहराच्या लोकसंख्येत झालेली वाढ, गावचे शहरीकरण झाले. नगरपालिकेने भविष्यातील 30 वर्षाची लोकसंख्या विचारात घेऊन नवीन पाणी पुरवठा योजनेचे प्रयोजन केले. शास्वत व कायमस्वरूपी उद्भव म्हणून ‘उजनी धरणातील’ पिण्याच्या पाण्याचे आरक्षण 4.625 दलघमी पाणी 1 जानेवारी 2019 रोजी मंजूर करून आरक्षितही केले आहे.

सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जामखेड नगरपालिका कार्यक्षेत्रा करिता 179.98 कोटी रुपये किमतीची अंदाजपत्रके व आराखडे तयार करून त्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्राधिकरणामार्फत फेर तांत्रिक मंजुरी मिळाली. ही योजना प्रशासकीय मंजुरीसाठी शासनास सादर करण्यात आली. 1 डिसेंबर 2022 रोजी 179.98 कोटी किमतीच्या पाणी पुरवठा योजनेस नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. जामखेड शहरापासून 66 किमी अंतरावर असलेल्या उजनी धरणातील उद्भव शास्वत व कायमस्वरूपी म्हणून प्रस्तावित करण्यात आलेला आहे. योजनेच्या ई.निविदा जामखेड नगरपरिषदेच्या मार्फत मागविण्यात येत असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यारंभ आदेशापासून 24 महिन्यात काम पूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे.
योजनेमुळे शहराची भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई संपुष्टात येणार आहे. योजनेमध्ये अस्तित्वातील भूतवडा तलाव पासून नवीन जलशुद्धीकरण केंद्रापर्यत 450 मिमी व्यासाची सुमारे तीन किमी अंतरावरून पाणी टाकण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. शिवाय शहरात सोलर पॅनल उभारण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

प्रस्तावित योजनेचे स्वरूप

उजनी धरणामध्ये शीर्षकामांतर्गत जोड चर, जॅकवेल व पंप हाउस, पोहोच रस्ता आदी कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. जॅकवेल मधील पाणी 442 अश्वशक्तीच्या पंपाद्वारे (2 चालू + 1 राखीव) आणि 500 मिमी व्यासाच्या डीआय के-9 ऊर्ध्वनलीकेद्वारे (लांबी 66.25 किमी) शहरातील 12.50 दललि क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पडेल. तेथून नव्याने बांधण्यात येणार्‍या 5 उंच टाक्यांमध्ये टाकले जाईल. या टाक्यातून शहरास पाणीपुरवठा केला जाईल.

या पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळताच नगरपालिका योजनेची दहा टक्के रक्कम भरणार आहे. ही रक्कम उपलब्ध नसली तरी ती भरण्याची तरतूद करण्याची तजवीज केलेली आहे.
– अजय साळवे, मुख्याधिकारी, नगरपालिका, जामखेड

Back to top button