नगर: ज्याचा फोन लागतो, त्याचाच पगार घ्या! आमदार नीलेश लंकेंनी अधिकार्‍यांना सुनावले | पुढारी

नगर: ज्याचा फोन लागतो, त्याचाच पगार घ्या! आमदार नीलेश लंकेंनी अधिकार्‍यांना सुनावले

पारनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: तहसीलमध्ये कोणत्या अधिकार्‍याचे काय चालते, याची इत्यंभूत माहिती आमच्याकडे आहे. आम्हाला वरून फोन आला पाहिजे, असे अधिकार्‍यांकडून कार्यकर्त्यांना सांगितले जाते. ज्याचा फोन लागतो, त्याचा जाऊन पगार घ्यायचा. यापुढे आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यास असे सांगितल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड इशारा आमदार नीलेश लंके यांनी महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना दिला. ईडी, भाजपा सरकार विरोधात पारनेर येथील तहसील कार्यालयात राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने सोमवारी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रभारी तहसीलदार सुभाष कदम यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी आमदार लंके म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी अत्यंत गरीब लोक असल्याने त्यांची प्रकरणे त्वरित मंजूर करून घेणे गरजेचे आहे. मात्र, आलेल्या नागरिकांशी अधिकारी व्यवस्थित बोलत नाहीत. त्यांच्या अडचणी समजावून घेत नाहीत. त्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. प्रलंबित प्रकरणे मार्गी न लावल्यास तहसील कार्यालयात मोठे आंदोलन होईल. दोषींवर कारवाई होईपर्यंत मागे हटणार नाही. यावेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विक्रम कळमकर, नगराध्यक्ष विजय औटी, रा. या. औटी, सरपंच प्रकाश गाजरे, जितेश सरडे, रवींद्र गायके, कारभारी पोटघन, बाजीराव कारखिले, बाळासाहेब खिलारी, बाळासाहेब कावरे, बंडू गायकवाड, विजय डोळ, सुभाष शिंदे, भूषण शेलार, बाळासाहेब औटी आदी उपस्थित होते.

अधिकारी, कर्मचार्‍यांची झाडाझडती

आमदार लंके यांनी कार्यालयातील अधिकारी कर्मचार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली. संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरणे मंजूर होऊनही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होत नाहीत. प्रलंबित प्रकरणातील त्रूटी दूर करून ते मार्गी लावा. उडवावडीचे उत्तरे देऊ नका, असे त्यांनी बजावले.

Back to top button