पाथर्डी तालुका : भांडणात मध्यस्थी करणार्‍या महिलेचा डोक्यात दांडके घालून खून | पुढारी

पाथर्डी तालुका : भांडणात मध्यस्थी करणार्‍या महिलेचा डोक्यात दांडके घालून खून

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : भावाचा मेहुण्याशी सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या महिलेचा मेहुण्याच्या मुलाने डोक्यात लाकडी दांडके मारून खून केला. तालुक्यातील धायतडकवाडी येथे सोमवारी (दि. 22) दुपारी ही घटना घडली. ग्रामस्थांनी पकडून ठेवलेले आरोपी शहादेव धाडतडक व शुभम धायतडक या बापलेकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुशाला राजेंद्र कीर्तने (वय 43) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचे पती राजेंद्र कीर्तने यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीचा आशय असा ः कीर्तने यांच्या मुलाचा रविवारी तिसगाव तेथे विवाह झाला. त्यानंतर सोमवारी बडेवाडी येथे एका दशक्रिया विधीमध्ये सुशाला यांचा भाऊ बाळासाहेब शिरसाट व मेहुणा शहादेव धायतडक यांच्यात किरकोळ वाद झाला.

त्यानंतर दुपारी शहादेव धायतडक, त्यांचा मुलगा शुभम व शुभमचे चार मित्र तीन मोटारसायकलवरून कीर्तनवाडी येथे आले. त्यांच्याकडे धारदार हत्यारे होती. राजेंद्र कीर्तने यांच्या घरी पुन्हा वाद सुरू झाला. त्या वेळी राजेंद्र, सुशाला व भागवत कीर्तने वाद सोडविण्यासाठी मध्ये गेले. घरी शुभकार्य असल्याने वाद घालू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने शुभमने लाकडी दांडक्याने सुशाला यांच्या डोक्यात फटका मारला. त्यात सुशाला बेशुद्ध झाल्या. राजेंद्र यांचे चुलते धनाजी नामदेव कीर्तने हेही जखमी झाले.

दरम्यान, या हल्ल्यानंतर चौघेजण पळून गेले. शहादेव व शुभम धायतडक यांना ग्रामस्थांनी पकडून ठेवले. सुशालास खरवंडी व नंतर पाथर्डी येथे खासगी दवाखान्यात आणले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी शहादेव रामकिसन धायतडक, शुभम शहादेव धायतडक, रणजित आजिनाथ धायतडक, अक्षय सखाराम धायतडक (रा. धायतडकवाडी), संदीप बाळासाहेब शिरसाट (पिंपळगावटप्पा), सोमनाथ गणपत घुले (शेकटे) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी पाथर्डी पोलिस ठाण्याला भेट देऊन माहिती घेतली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक निरीक्षक रामेश्वर कायंदे, कौशल्य रामनिरंजन वाघ यांनी घटनास्थळी पाहणी केली.

Back to top button