अकोले : बहगुणी रानमेव्याची होतेय लयलूट..!

अकोले : बहगुणी रानमेव्याची होतेय लयलूट..!
Published on
Updated on

अकोले; पुढारी वृत्तसेवा : विविध वृक्षराजीने समृद्ध असलेल्या आदिवासी भागातील कळसूबाई, हरिश्चंद्रगड राना वनात करवंद, जांभूळ, तोरणं, आळंवं, आंबे आदी विविध प्रकारचा रानमेवा दाखल झाला आहे. तो खाण्यासाठी खवय्ये अक्षरशः तुटून पडत आहेत. जणूकाही मेजवाणीच मिळत असल्याचे मोहक चित्र आदिवासी भागात दिसत आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कळसूबाई, हरिश्चंद्रगड परीसरात राना-वनात करवंद, जांभूळ, तोरणं, आळंवं, आंबे आदी विविध प्रकारचा रानमेवा दाखल झाला आहे. अवकाळी पावसामुळे रानमेव्याचे उत्पादन घटले, मात्र सध्या आदिवासी बांधव राहिलेला रानमेवा बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यांना यातून चांगला रोजगार देखील मिळतो.

केवळ याच हंगामात मिळणारी करवंद व जांभळे बाजारात आली आहेत. आकाराने मोठी जांभळे व करवंदांना मोठी मागणी आहे. मधुमेहावर जांभळे अतिशय गुणकारी आहेत. आदिवासी महिला व पुरुष रानातून जांभळे व करवंद गोळा करून टोपलीत घेऊन अकोले तालुक्याच्या बाजारासह संगमनेर व राहाता परिसरात विक्रीसाठी नेतात.

मागील वर्षी 10 रुपयांना मिळणारा वाटा आता 20 रुपयांवर पोहोचला आहे. तरीही खवय्ये तो आवर्जून विकत घेत आहेत. रानामध्ये जाऊन करवंदाच्या जाळीतून करवंद काढणे हा काही वेगळाच आनंद असतो. गुलाबी, लाल रंगांची गोड तोरणं सर्वजण आवडीने खातात. खाण्यास ती पिठूळ असतात. सध्या बाजारात तोरणं कमी दिसत आहेत. त्याच्या बियाही भाजून खाल्ल्या जातात. हिरड्या व दात दुखीवर त्याचा चांगला फरक पडतो, असे जाणकार सांगतात. आदिवासी भागात मुले करवंदे व जांभळांची विक्री करून शाळेसह घराला हातभार लावतात.

जैव विविधतेचे प्रतिनिधित्व करण्यास उपयुक्त!

या रानफळांमधून आदिवासी बांधवांसह जंगलातल्या प्राण्यांना शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्वे, प्रथीने, लोह व कॅल्शियम मिळते. आदिवासी समाजासाठी रानमेवा हे महत्त्वाचे उदरनिर्वाहाचे साधन ठरले आहे. रानमेवा ज्या प्रदेशात उगवतो, त्या प्रदेशातील जैव विविधतेचे प्रतिनिधित्व देखील तो करतो, असे जाणकार सांगतात.

रानमेवा संवर्धन करण्याची आवश्यकता..!

जंगलांचे संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे. जंगल वाचले तर त्यामधील रानमेवा वाचवला जाईल. रानमेव्याचे औषधी गुण लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याकरिता शहरांमध्ये रानमेव्याबाबत मोठ्या प्रमाणात माहिती प्रसारित झाली पाहिजे. वृक्ष लागवड करतेवेळी प्रदेशनिष्ठ रानमेव्याचा विचार करून त्या झाडांच्या लागवडीस प्राधान्य दिले पाहिजे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news