अहमदनगर : कांदा उत्पादक शेतकर्‍यांची दैना | पुढारी

अहमदनगर : कांदा उत्पादक शेतकर्‍यांची दैना

अहमदनगर तालुका : नगर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे. सद्यस्थितीत कांद्याला भाव नाही. त्यातच खराब हवामान व अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसल्याने कांदा चाळीत देखील टिकणार नाही. कांदा खरेदीसाठी व्यापार्‍यांनी पाठ फिरवली असून, खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

नगर तालुक्याची ओळख ’ज्वारीचे पठार’ म्हणून होती. परंतु गेल्या दशकापासून ज्वारीचे पठार असलेली ओळख पुसत नगर तालुका कांद्याचे पठार म्हणून उदयास येत आहे. तालुक्यात लाल कांदा, रांगडा कांदा, तसेच गावरान कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. परंतु चालू वर्षी कांद्याने शेतकर्‍यांना अक्षरशः रडवले आहे. लाल, तसेच रांगडा कांदा कवडीमोल भावाने विकावा लागला. खरीप हंगामातील मूग, सोयाबीन, बाजरी पिकांची अतिवृष्टीने वाताहत झाली.

तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी सुमारे 25 हजार हेक्टर, गहू 10 हजार हेक्टर, हरभरा 12 हजार हेक्टर, तर कांद्याची लागवड सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली होती. परंतु रब्बी हंगामातील सर्वच पिकांना खराब हवामानाचा फटका बसला आहे. धुके, ढगाळ वातावरण अन् अवकाळी पाऊस तसेच काही भागात झालेल्या गारपिटीने शेतकर्‍यांची अवस्था बिकट बनली आहे.

देहरे पट्ट्यात झालेल्या गारपिटीने कांदा पिकाचे संपूर्णतः नुकसान झाल्याने उभ्या पिकात नांगर फिरवण्याची वेळ आली. भाजीपाल्यालाही भाव मिळाला नाही, गावरान कांद्याला लागवडीपासूनच पोषक वातावरण नव्हते. त्यामुळे महागडी औषधे फवारणी, खते टाकून उत्पादन घेण्याचा शेतकर्‍यांनी प्रयत्न केला. परंतु अवकाळी पावसाने कांदा झोडपल्यामुळे कांदा चाळीत देखील टिकणार नाही. काही ठिकाणी, तर कांद्याचा अक्षरशः चिखल झाला होता.

अवकाळीने झोडपलेला कांदा खरेदीसाठी व्यापारी ही धजत नाहीत. शिवार खरेदी संपूर्णतः बंदच असल्याचे दिसून येते. जेऊर पट्ट्यात, तर तालुक्यात सर्वात जास्त कांदा उत्पादन होते. कांदा उत्पादन जास्त होत असल्याने अनेक परराज्यातील कांदा व्यापारी येथे स्थायिक झालेले आहेत. परंतु सद्यस्थितीत येथील कांद्याला अवकाळीचा फटका बसल्यामुळे व्यापारी कांदा खरेदी करत नाहीत. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन होणारी कांदा खरेदी बंद झाल्याचे दिसून येते.

कांद्याला भाव नाही. कांदा चाळीत टिकणार नाही, तसेच खरेदीला व्यापारी नकार देत आहेत. अशा परिस्थितीत काय करावे? असा यक्ष प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे. कांद्याला सद्यस्थितीत काजळी तसेच कोंब येण्यास सुरुवात झाली आहे. कांदा बाजारात पाठवावा, तर मजुराचा खर्च देखील वसूल होत नाही.

जुलै-ऑगस्टमध्ये भाव वाढणार?

अवकाळी पावसामुळे कांद्याचा उत्पादन दर्जा घसरला आहे. कांदा खरेदी करून छत्तीसगड, आंध्र्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओडिसा, पश्चिम बंगाल या राज्यात पाठविला जातो. परंतु, त्यासाठी चार ते पाच दिवस लागतात. या कालावधीत कांदा खराब होत असल्याने खरेदी बंद आहे. जुलै, ऑगस्टमध्ये भाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांनी कांदा टिकण्याची क्षमता पाहून विक्रीचा निर्णय घ्यावा, असे कांदा व्यापारी अक्षय कटारिया यांनी सांगितले.

मूग, सोयाबीन, बाजरीचे अतिवृष्टीने उत्पादन पदरी आलेच नाही. रब्बी पिकांच्या उत्पादनावर खराब हवामानाचा परिणाम झाला. सद्यस्थितीत गावरान कांदा काढून पडला आहे. अवकाळीने झोडपल्यामुळे कांदा चाळीत टिकणार नाही. झालेला खर्च देखील वसूल होत नाही.
                                                – सोमनाथ शेटे,
                                          कांदा उत्पादक शेतकरी

Back to top button