अहमदनगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील इमामपूर, बहिरवाडी तसेच मजले चिंचोली परिसरातील डोंगराला शनिवारी (दि.20) रात्री लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली. अथक प्रयत्नानंतर वणवा आटोक्यात आणण्यात वन विभागाला यश आले. इमामपूर तसेच बहिरवाडी परिसरातील चिमणा डोंगर, कडका डोंगर व मजले चिंचोलीच्या सोनदरा पट्ट्यात वणवा लागला होता. पठार तसेच दरीमध्ये वाळलेले मोठे गवत असल्याने वणव्याने रौद्ररूप धारण केले होते. यामध्ये शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे. अनेक औषधी वनस्पती, नैसर्गिक वृक्ष, पक्ष्यांची घरटे, खोफे, सरपटणारे प्राणी, पक्षी यांचे मोठे नुकसान झाले आहे. वणव्यामुळे वन्य प्राणी, पक्षी जीवाच्या आकांताने सैरावैरा धावत होते.