कोपरगाव : लाचखोर तहसीलदाराची कोठडीत रवानगी !

कोपरगाव : लाचखोर तहसीलदाराची कोठडीत रवानगी !

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अवैध वाळूचे वाहन सोडण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी येथील तहसीलदार विजय बोरुडेसह हस्तक गुरमीतसिंग दडीयाल या दोघांना नाशिकच्या लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. येथील तहसील कार्यालयाजवळ एका हॉटेलमध्ये ही कारवाई झाली.

तहसीलदारासह हस्तकास अटक करण्यात आली. दरम्यान, दोघांना विशेष न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्याचे आदेश दिल्याचे तपासी अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी सांगितले. पकडलेला वाळूचा डंपर सोडण्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी लाच मागितली होती, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

योगेश संजय कोळपे (वय 33 वर्षे) या वाळू वाहतूक करणार्‍या कोळपेवाडी येथील ईसमाने तक्रार दाखल केली होती. वाळू वाहतूकीच्या गाडीवर कारवाई न करण्यासह हायवा गाडीने वाळू वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी हप्ता म्हणून 65 हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती 20 हजार रुपये घेण्याचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी मान्य केले. बोरुडे यांनी हस्तक गुरमीत हरजीतसिंग दडीयाल (वय 40) यास लाच मागणीस प्रोत्साहन दिले. दडीयालने 20 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच लाच- लुचपतच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदारावर केस न करता पकडलेला वाळूचा डंपर सोडण्यासाठी तहसीलदार विजय बोरूडे यांनी स्वत:साठी 20 हजारांची लाच मागितली. लाचेची रक्कम हस्तक दडीयालकडे देण्यास सांगितले होते. त्याला 20 हजारांची लाच स्वीकारताना पंच व साक्षीदारांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
याबाबत 17 मे रोजी तक्रारदाराने नाशिकच्या लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनंतर लाच प्रकरणी पडताळणी करण्यात आली.

लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर येथील तहसीलदार कार्यालयात लावलेल्या सापळ्यात बोरूडे व दडियाल अलगद अडकले.
ही कारवाई नाशिकचे लाच- लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलिस अधीक्षक, अप्पर पो. अधीक्षक नारायण न्याहाळदे, नरेंद्र पवार, पो. उपाधीक्षक वाचक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे सक्षम प्राधिकारी अप्पर मुख्य सचिव, सापळा अधिकारी, पो. नि. संदीप साळुंखे, वैशाली पाटील, लाच लुचपत प्रतिबंधकच्या पथकाचे पो. ह. पंकज पळशीकर ,पो.ना. नितीन कराड, प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी, चालक पो.ना. संतोष गांगुर्डे यांनी ही कारवाई यशस्वी केली. कोणत्याही अधिकार्‍याने कसल्याही कामासाठी लाच मागितल्यास त्याची तक्रार नाशिक लाच- लुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे करावी, असे आवाहन त्यांनी केले. पुढील तपास पो.नि. रामराव ढिकले, लाचलुचपतचे पो. नि. संदीप साळुंखे करीत आहेत.

तहसीलदार बोरुडे दुसर्‍यांदा आले चर्चेत..!

तहसीलदार विजय बोरुडे याआधी एका परिचारिकेचा विनयभंग प्रकरणी चर्चेत आले होते. आता लाच प्रकरणात ते सापडल्याने पुन्हा चर्चेचा विषय ठरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news