वाळकी : बेपत्ता नरवडेंचा मृतदेह उसाच्या शेतात | पुढारी

वाळकी : बेपत्ता नरवडेंचा मृतदेह उसाच्या शेतात

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आठ दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या टाकळी खातगाव येथील 57 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी (दि.19) सकाळी गावच्या शिवारातील उसाच्या शेतात आढळून आला. अर्जुन भिमाजी नरवडे, असे त्यांचे नाव आहे. नरवडे यांचा मृत्यू वन्य प्राण्याच्या हल्ल्यात झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला; मात्र वनविभागाच्या अधिकार्‍यांनी ही शक्यता फेटाळली.

नरवडे हे वाहनावर चालक म्हणून नोकरी करत होते. त्यांच्याकडे मोबाईलही नव्हता. सुरुवातीला 2-3 दिवस त्यांच्या कुटुंबियांनी ते बाहेरगावी गेले असतील असे समजून चौकशी केली नाही. मात्र; चार दिवसानंतरही ते घेरी न आल्याने त्यांच्या घरच्यांनी पाहुण्यांकडे चौकशी केली. गाडी मालकाकडेही चौकशी केली असता ते आढळून आले नाही.

कुटुंबीय त्यांच्या शोधात असताना शुक्रवारी (दि.19) सकाळी शिवारातील उसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतमालकाने रात्री मोटार चालू केली होती. सकाळी शेतमालक पाणी किती सरीमध्ये पोहचले ते पाहाण्यासाठी शेतात गेले होते. शेतात पाहणी करत असताना त्यांना एका सरीमध्ये मृतदेह अढळून आला. त्या शेतमालकाने तातडीने आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू नरवडे यांना बोलावून घेतले. मृतदेहाची पाहाणी केल्यानंतर हा मृतदेह अर्जुन नरवडेंचा असल्याचे समोर आले.

परिसरात बिबट्या सारख्या वन्य प्राण्यांचा वावर असल्याने वन्य प्राण्याच्या हल्ल्यात अर्जुन नरवडेंचा मृत्यू झाला की, काय? याची माहिती घेण्यासाठी राजू नरवडे व माजी सरपंच सुनील नरवडे यांनी वनविभागाचे अधिकारी सुरेश राठोड यांना फोनवर घटनेची माहिती दिली. राठोड यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मात्र, मयतावर कुठल्याही वन्य प्राण्याच्या हल्ल्याच्या खुणा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलिस अंमलदार किशोर जाधव, सुनील आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

Back to top button