अहमदनगर : आता जांभूळ जांभळ्या नव्हे पांढर्‍या रंगाचे..! आयटी इंजिनिअरचा शेतात अनोखा प्रयोग | पुढारी

अहमदनगर : आता जांभूळ जांभळ्या नव्हे पांढर्‍या रंगाचे..! आयटी इंजिनिअरचा शेतात अनोखा प्रयोग

एकरुखे(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यात जांभूळ खाण्याचा मोह कोणाला आवडत नाही. फिरायला जाताना किंवा कुटुंबासमवेत निवांत वेळी जांभूळ खाण्याची मजाच वेगळी असते. आजपर्यंत आपण सर्वांनी जांभळा रंगाचे जांभूळ पाहिले आणि खाल्ले, मात्र पांढर्‍या रंगाच्या जांभळाची कधी कल्पना केली नसेल, परंतु हे खरं ठरले आहे. राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथील विक्रांत रुपेद्र काले यांनी पांढर्‍या रंगाचे जांभूळ पीकऊन लाखो रुपयाचे उत्पन्न घेतले. विक्रांत काले हे आयटी इंजिनियर आहे.

लाखो रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी सोडून त्यांनी शेतीत नवीन पीक घेण्याच्या निश्चावर वाकडी परिसरात आपली शेती सांभाळी. याआधी त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये पिकणारे सफरचंद पिकाची लागवड करून व्यवस्थित फळ घेऊन प्रयोग यशस्वी केला. तीन वर्षांपूर्वी बारा- बाय बारा फुटांवर एकरी 325 पांढर्‍या रंगाचे जांभूळ फळ असलेली झाडे बसविली. या तीन वर्षात अंतर पीक देखील घेतले. आता चांगले जांभूळ पीक आल्यावर एका झाडाला सरासरी सात ते आठ किलो फळ निघत आहेत.

पुढे अजून दोन ते तीन वर्षांनी याच झाडाला 20 ते 25 किलो फळ निघेल. या पांढर्‍या रंगाच्या जांभूळ पिकास सरासरी 250 रुपये किलोचा भाव मिळाला. हे झाड 20 ते 25 वर्षे फळ देऊ शकते. ही फळबाग लावण्यास सुरुवातीला एकरी सरासरी एक ते दीड लाख रुपये खर्च येतो, मात्र तीन वर्षे अंतर पिकात हा खर्च निघतो. नंतर जशी- जशी ही झाडे वाढेल त्या प्रमाणात उत्पन्न देखील वाढेल. नंतर या पिकास खते व इतर खर्च कमी असणार आहे.

विक्रांत काले यांची वाकडी श्रीरामपूर रस्त्यावर संकेत नर्सरी आहे. या नर्सरीत त्यांनी ही सर्व रोपे तयार करून विक्रीसाठी ठेवली आहे.
विक्रांत काले यांचे वडील रुपेंद्र काले शेतकरी संघटनेचे सक्रिय पदाधिकारी आहे. रुपेंद्र काले यांचा शेतीचा चांगला अभ्यास आहे. वडिलांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनने विक्रांत काले यांनी आपल्या शेतात बाहेर राज्यातील पिके घेऊन ते पीकविली आहे. आपल्या परिसरात नेहमी पीकविणार्‍या शेती पिकाबरोबर दुसरे नवीन पीक उत्पन्न कसे घेता येईल, परिसरातील शेतकर्‍यांना देखील या शेती पिकाचा कसा फायदा होईल, याकडे विक्रांत काले यांचे नेहमी लक्ष असते.

Back to top button