अकोले : कळसूबाई अभयारण्यात काजवा महोत्सव | पुढारी

अकोले : कळसूबाई अभयारण्यात काजवा महोत्सव

अकोले(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरातील कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळातर्फे (दि.3 व 4 जून) रोजी काजवा महोत्सव सुरू होणार आहे. दरम्यान, हौशी पर्यटकांना काजवा महोत्सवाचा मनमुराद आनंद घेताना अभयारण्य व पोलिसांच्या नियमावलींचे पालन करावे लागणार आहे. नियमावलींचे पालन न करणार्‍या पर्यटक व टेंटधारकांना अभयारण्य व पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणार्‍या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरू होते. ही काजव्यांची चमचम म्हणजे पावसाची चाहुल असते. हिरडा, बेहडा, सादडा यासारख्या झाडांवर स्वयंप्रकाशित काजवा किटक कोट्यवधींच्या संख्येने एकाचवेळी लयबद्ध पद्धतीने चमकतात. हा काजव्यांचा चमत्कार बघण्यासाठी दरवर्षी 25 मे ते 15 जूनपर्यंत हजारो पर्यटक भंडारदर्‍यात दाखल होतात. या वर्षीदेखील काजव्यांची चमचम वेळेवर सुरू होण्याची शक्यता आहे.

अनेक पर्यटकांनी आपल्याला काजव्यांचा हा करिष्मा व्यवस्थित बघता यावा म्हणून टेंटधारक व हॉटेलमध्ये काही पर्यटकांनी अगोदरच बुकिंग केली आहे. काही ऑर्गनायझर्सनी काजवा महोत्सवामध्ये वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले आहेत. अनेक आयोजकांनी पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. काजवा महोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात जोरदार तयारी सुरू आहे.

पर्यटकांना काजव्यांचा व्यवस्थित आनंद घेता यावा म्हणून पर्यटन विभागाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई, प्रकल्प अधिकारी राजन पाटील, सहायक वन संरक्षक गणेश रणदिवे, स. पो. नि.गणेश इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे व टेंटधारक, अभयारण्यातील प्रत्येक गावातील सदस्यांची आढावा बैठक घेण्यात आली. काजवा महोत्सवात नियोजन व अडचणींबाबत यावेळी चर्चा करून पर्यटकांनी कायद्याचे पालन करण्याबाबत सूचित केले. पर्यटकांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केल्यास दंड करण्यात येणार आहे. भंडारदरा धरण परिसरातील हॉटेल व्यावसायिक, सुशिक्षीत बेरोजगार तरुण, गाईड व महाराष्ट्र पर्यटन निवास यांनीही पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती दिल्या आहेत.

तीन वर्षांपूर्वी कोरोनामुळे काजवा महोत्सवावर विपरीत परिणाम होऊन आदिवासी युवकांचा रोजगार थांबला होता, मात्र गतवर्षापासून पुन्हा काजवा महोत्सव जोमाने सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर काजवा महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने रात्री साडेनऊ वाजेनंतर अभयारण्य क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही. 10 वाजेनंतर पर्यटकांना अभयारण्य परिसरात फिरता येणार नाही. ठिक-ठिकाणी पर्यटक व त्यांच्या वाहनांची तपासणी करणार असल्याचे वन्यजीव वनविभागचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितले.

मादी काजवे नष्ट होण्याचा संभवतोय धोका..!

काजवा महोत्सवादरम्यान अनेक पर्यटक काजव्यांनी फुललेल्या झाडांच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. हवेत संचार करणारे काजवे नर असतात, तर मादी काजवे कायमच अळीच्या स्वरूपात जमिनीखाली असतात. पर्यटकांच्या अनियंत्रित वावरण्याने मादी काजवे नष्ट होण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे काजवा महोत्सवादरम्यान होणारे वनक्षेत्रातील पर्यटन नियंत्रित असण्याची गरज व्यक्त होत आहे.

भंडारदरा परिसरात पर्यटकांनी काजवा महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटावा. कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे. मद्यपान करून धांगडधिंगा घालणार्‍या पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

                                                    – स. पो. नि. गणेश इंगळे, राजूर

Back to top button