श्रीरामपुरात दगडफेकप्रकरणी धरपकड सत्र ! चादर मिरवणुकीवर दगडफेक | पुढारी

श्रीरामपुरात दगडफेकप्रकरणी धरपकड सत्र ! चादर मिरवणुकीवर दगडफेक

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गोंधवणीत निघालेल्या चादर मिरवणुकीवर काहींनी दगडफेक केल्याने गुरुवारी रात्री गोंधवणीरोड परिसरात धावपळ झाली. दरम्यान, दगडफेकीत मिरवणुकीतील गाडीची काच फुटली. याप्रकरणी 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आज (शुक्रवारी) दोघांना ताब्यात घेण्यात असून धरपकड सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस सूत्रांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिस नाईक संजय पवार यांनी फिर्याद दिली. (दि. 18 मे) रोजी सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास गोंधवणी येथील पाण्याच्या टाकीपासून चादर मिरवणूक निघाली.

वाजत-गाजत ती गोंधवणी रोडवर पाटाच्या जवळ मुख्य रस्त्यावर आली असता रात्री 8 वाजेच्या सुमारास मिरवणुकी मागून काहीजण आले. त्यांनी मिरवणुकीतील लोकांना, ‘वाद्य बंद करा,’ असे म्हणत मिरवणूक थांबवून दमदाटी केली. या लोकांना बंदोबस्तातील पोलिसांनी थांबवण्याचा व मिरवणुकीतून बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता शिवीगाळ करून हे लोक पळून गेले. थोड्या अंतरावर जावून त्यांनी पोलिसांच्या दिशेने पाच दगड फेकले. एक दगड मिरवणुकीतील चारचाकीला लागल्याने काच फुटली.

पालिकेच्या खांबावरील विजेचे बल्बही फुटले. यामुळे मिरवुणकीत गोंधळ निर्माण झाला. मिरवणुकीतील लोक आरडाओरडा करत पळू लागले. यामुळे रस्त्यावरील दुकाने व बाजारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. दुकानदारांनी दुकाने तातडीने बंद केले. तातडीने शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी आले. बंदोबस्तात मिरवणूक वेस्टर्न चौक, वॉर्ड नं. 2 येथे नेऊन शांततेत विसर्जन केले.

याबाबत शहर पोलिसात प्रशांत मुंडलिक, नमोद कांबळे, विकी ढमक, काल्या (पूर्ण नाव माहित नाही), भैय्या दाभाडे, किरण भोकर, चेतन मरसाळे, विवेक दाभडे, दीपक चव्हाण, राज हातांगळे, सिद्धार्थ गायके, चैतन्य परदेशी, पप्पू कांबळेसह इतर 20 ते 25 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो. नि. हर्षवर्धन गवळी व पोलिस करीत आहेत.

रात्री 12 वाजेपर्यंत शहरात होता तणाव..!

शहरातील सय्यद बाबा चौकात स्वत: अप्पर अधीक्षक स्वाती भोर पोलिसांसह रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून बसल्याने अनुचित प्रकार घडला नाही. रात्री 12 वाजेपर्यंत शहरात तणाव जाणवत होता., परंतु वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

Back to top button