

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणार्या आरोपी पतीस नेवासा न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी 7 वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अजय उर्फ बाळासाहेब सुगंध चक्रनारायण (रा.राजवाडा, नेवासा खुर्द) असे आरोपी पतीचे नाव आहे. 20 मे 2018 रोजी जेवण झाल्यानंतर रात्री 11.30 वाजता आरोपीची पत्नी अनिता, मुलगा अनिकेत व मुलगी अंजली हे गाढ झोपेत होते. चारित्र्याचा संशय घेऊन आरोपीने अनिताच्या डोक्यात व मानेजवळ कुर्हाडीने वार केले.
अनिताचा ओरडण्याचा आवाज ऐकून दोन्ही मुले जागी झाली. वडील आईला कुर्हाडीने मारहाण करीत असल्याचे पाहून मुलगा अनिकेत याने वडिलांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपी अजय याने मुलाच्या पायावर कुर्हाडीने वार केला व मुलगी अंजली ही मध्ये आली असता, तिलाही मारहाण केली व पुन्हा पत्नीवर कुर्हाडीने वार केला. त्यामुळे पत्नी जागेवरच बेशुद्ध झाली.
आरडाओरड झाल्याने शेजारील लोक तेथे जमा झाले. त्यांनी लगेचच जखमींना गाडीत घालून नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अनिता ही गंभीर जखमी असल्याने डॉक्टरांनी तिला तत्काळ नगरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याने तिचा जीव वाचला. त्यांनतर शुद्धीत आल्यावर 25 मे 2018 रोजी तिने पोलीसांना जबाब दिला. त्यानंतर आरोपीविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 307, 324, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्ह्याचा तपास करून नेवासा पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात फिर्यादी पत्नी, डॉक्टर व जखमी साक्षीदार यांचे जबाब, पुरावा महत्त्वाचा ठरला. सरकार पक्षातर्फे सादर साक्षीपुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून, न्यायालयाने आरोपीस दोषी धरून, भादंवि. कलम 307 अन्वये 7 वर्षे सश्रम कारावास व दीड लाखाचा दंड, भादंवि 324 अन्वये 2 वर्षे कारावास व कलम 504 अन्वये 3 महिने कारावास व भादंवि कलम 506 अन्वये 2 वर्षे कारावास व 5 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून 1 लाख रूपये फिर्यादी पत्नीला व 45 हजार रूपये जखमी साक्षीदारास देण्याचे आदेश केले आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मयुरेश नवले यांनी काम पाहिले, पो.कॉ. सुभाष हजारे, पैरवी अधिकारी पो.कॉ. बाळासाहेब बाचकर, राजेंद्र काळे, नवगिरे, एस. एम. म्हस्के, आर. एस. पवार यांचे सहकार्य लाभले.