कर्जत : एमआयडीसीसाठी रोहित पवार आक्रमक

कर्जत : एमआयडीसीसाठी रोहित पवार आक्रमक
Published on
Updated on

कर्जत/जामखेड(अहमदनगर) : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात औद्योगिक वसाहत होण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. एमआयडीसीची अधिसूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी जाहीर करून, इतर कायदेशीर बाबी राजर्षी शाहू महाराज जयंतीपर्यंत पूर्ण करावी. अन्यथा हजारो नागरिकांसह उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आमदार पवार यांनी मतदारसंघात एमआयडीसी होण्याबाबत चर्चा करून निवेदन दिलेले आहे. मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावित, येथील युवकांना रोजगार मिळावा, या उद्देशाने औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होण्यासाठी आमदार पवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

सन 2019 मध्ये हिवाळी अधिवेशनात त्यांनी एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, सर्वेक्षण करण्यात आले. मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होण्याच्या दृष्टीने औद्योगिक विकास विभागामार्फत भू-निवड समितीची स्थळ पाहणी व ड्रोन सर्वेक्षण होऊन उच्चाधिकार समितीच्या बैठकीची मान्यता देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळाली.

उच्चाधिकार समितीची सर्वात मोठी बैठक पार पडून बैठकीत मौजे पाटेगाव व खंडाळा येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास अधिनियम 1961 तरतुदीनुसार लागू करण्यास समितीने जुलै 2022 मध्ये मान्यताही दिली. परंतु, मान्यता असतानाही अजूनही या क्षेत्राची अधिसूचना झालेली नाही. याबाबत वेळोवेळी आमदार पवार यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला.

तसेच, उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन अधिसूचना जाहीर करण्याबाबत पाठपुरावाही केला. त्यावर मंत्र्यांनी निर्णय घेण्याबाबत आश्वासित केले. परंतु, अजूनही त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री सावंत यांची भेट घेऊन औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे 2023 रोजी जाहीर करून, इतर कायदेशीर बाबी या राजश्री शाहू महाराज जयंती दि. 26 जूनपर्यंत पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली आहे. याबाबत ठोस निर्णय होऊन कर्जत-जामखेडमधील जनतेवर राजकीय द्वेषापोटी होणारा अन्याय दूर न झाल्यास 26 जूनपासून हजारो नागरिक, युवकांसह उपोषणाला बसणार असल्याचे आमदार पवार यांनी म्हटले आहे.

केवळ राजकीय द्वेषातून विलंब

मतदारसंघातील युवक व नागरिकांसाठी उपोषण करण्याची वेळ आली तरी मी त्याला तयार आहे. केवळ राजकीय द्वेषातून मंजूर झालेली एमआयडीसी ही फक्त पुढे-पुढे ढकलून सामान्य लोकांवरच अन्याय होतोय, हे सत्तेत असलेल्या लोकांनी लक्षात घ्यावे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news