नगर: दरोड्याच्या तयारीतील सराईत टोळी गजाआड, एलसीबीची कारवाई | पुढारी

नगर: दरोड्याच्या तयारीतील सराईत टोळी गजाआड, एलसीबीची कारवाई

नगर, पुढारी वृत्तसेवा: दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत पाच आरोपींच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. नगर-शिर्डी रस्त्यावरील निर्मलपिंप्री येथून एका अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एक जण पळून गेला आहे. एका चारचाकी वाहनासह पाच लाख 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याच टोळीकडून डिझेल चोरी व इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांना आहे.

अजय राजू भोसले (वय 25, रा. कडबा, शिर्डी, ता. राहाता), ऋतुंजय ऊर्फ अमोल अविनाश कुंदे (वय 19, रा. एकरुखे, ता. राहाता), योगेश किशोर कांबळे (वय 19, रा. बाजारतळ, कालीकानगर, शिर्डी), साईराम राजू गुडे (वय 23, रा.पांडुरंगनगर, शिर्डी), एक अल्पवयीन मुलगा अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, सतिष बाबासाहेब खरात (रा.शिर्डी, ता. राहाता) हा आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली होती की, शिर्डी-नगर रस्त्यावर निर्मळपिंप्री येथे सराईत टोळी दरोड्याच्या तयारीत आहे. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने परिसरात जावून पाहणी केली असता काही जण अंधारात बसलेले दिसून आले. पथकाची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करत पाच जणांना ताब्यात घेतले. लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास लोणी पोलिस करीत आहेत. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हवालदार मनोहर गोसावी, संदीप पवार, पोलिस नाईक रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, प्रशांत राठोड, संतोष खैरे, आकाश काळे, अमृत आढाव, संभाजी कोतकर यांनी ही कारवाई केली.

आरोपींवर शिर्डी, लोणी पोलिसांत गुन्हे

अटक केलेले आरोपी हे सराईत असून, शिर्डी व लोणी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. अमोल अविनाश कुंदे याच्यावर लोणी पोलिस ठाण्यात दरोडा व चोरी असे दोन गुन्हे दाखल आहेत. अजय राजू भोसले याच्यावर चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. तर, राजू गुडे याच्यावर शिर्डी पोलिसांत विनयभंग व चोरी असे इतर गुन्हे दाखल आहेत.

कोयता, चाकू अन् मिरची पूड

आरोपींकडून एक लोखंडी कोयता, चाकू, स्क्रूड्रायव्हर व मिरची पूड पोलिसांना मिळून आली आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा डाव उधळून लावला आहे.

Back to top button