झेडपी शाळांच्या गुणवत्तावाढीस सहकार्य: आमदार सत्यजित तांबे | पुढारी

झेडपी शाळांच्या गुणवत्तावाढीस सहकार्य: आमदार सत्यजित तांबे

नगर, पुढारी वृत्त्तसेवा: जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता विकासासाठी प्राथमिक शिक्षक आणि प्रशासनाच्या बरोबरीने मी लोकप्रतिनिधी म्हणून सहकार्य करणार आहे. तसेच प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध रितीने सोडविताना शिक्षकांच्या प्रश्नांचा निपटारा होण्याकरिता सातत्याने आग्रही राहणार आहे, अशी ग्वाही आमदार सत्त्यजित तांबे यांनी दिली.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या बरोबर शिक्षक परिषद संघटना पदाधिकार्‍यांची रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या विनंतीनुसार संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार तांबे बोलत होते.

याप्रसंगी नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होत असून नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शाळांना मुख्याध्यापक तसेच सर्व तालुक्यांमध्ये केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व प्रशासकीय कामकाजाला गती येण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापक, पदवीधर, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी पदोन्नती लवकरात लवकर करावी, अशी मागणी शिक्षक परिषद संघटनेच्या वतीने करण्यात आली.

तर बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर तसेच समायोजन करण्यापूर्वी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी मान्य केले. बदली प्रक्रियेनंतर पदोन्नती, समायोजन, कोर्ट पदस्थापना, पदवीधर पदावनती असा क्रम राहिल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. पदवीधर पदावनती ही पदोन्नतीच्या आधी करण्याची विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे समायोजन सन 2022-23 ची संचमान्यता मंजूर झाल्यानंतर करण्यात येणार असून त्यात कोणत्याही शिक्षकाची गैरसोय होणार नाही. सन 2022-23 मध्ये शासनाच्या बदली प्रक्रियेनुसार बदली झालेल्या शिक्षकांना शासन आदेशानुसार दि.16 मे रोजी कार्यमुक्त करण्यात येणार आहे. पदवीधर वेतनश्रेणी नाकारण्याचे सर्व 20 शिक्षकांचे प्रलंबित प्रस्ताव बदल्यांनंतर मंजूर करून त्यांना समुपदेशनाने पदस्थापना देणार असल्याचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले आहे.

याप्रसंगी प्राव्हिडंड फंड अग्रिम प्रस्ताव सादर केल्यानंतर किमान 15 दिवसांत मंजूर होऊन रक्कम खात्यावर जमा करण्याच्या दृष्टीने योग्य ते बदल करण्यात यावेत, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. त्यावर आमदार तांबे यांनी प्राव्हिडंड फंड अग्रिम प्रस्ताव, तत्सम प्रस्ताव कालबद्धरीत्या मंजूर होण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत.

पीएफ प्रस्तावांसह सदर कामांला राईट टू सर्विसमध्ये समावेश करण्यासाठी सुचविले. दरम्यान, त्यानंतर एनपीएसधारक शिक्षकांचे डीसीपीएस खाते कपातीचा हिशेब पूर्ण करून तसे प्रमाणपत्र संबंधित प्रभारींकडून घ्यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

आपले जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अंशदायी पेन्शन योजनेच्या 591 खातेधारकांची स्वत:च्या कपाती, शासनहिस्सा, जमा व्याज यांची हिशोब चिट्ठी (वार्षिक स्लीप) मध्ये तफावती व चुका दुरुस्त करण्यासाठी आ.सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे. आंतरजिल्हा बदलीने आपल्या जिल्ह्यात हजर झालेल्या अंशदायी पेन्शन योजनेच्या 662 खातेधारक प्राथमिक शिक्षकांच्या दोन्ही जिल्हा परिषद मिळून एकत्रित हिशेब करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार व पाठपुरावा करुन सर्व एनपीएस धारकांचा हिशेब 30 सप्टेंबर पर्यंत करण्याची सुचना आमदार तांबे यांनी केली आहे.

यावेळी माजी गटनेते अजय फटांगरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेचे राज्यनेते रावसाहेब रोहोकले गुरुजी, शिक्षक नेते प्रवीण ठुबे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष अविनाश निंभोरे, माजी उपाध्यक्ष नानासाहेब बडाख, विभागीय उपाध्यक्ष बाबासाहेब पवार, संजय शिंदे, राजू मुंगसे, शरद कोतकर, ज्येष्ठ नेते राजूभाई इनामदार, विजयराव काकडे, कार्यालयीन चिटणीस गणेश वाघ आदी उपस्थित होते.

Back to top button