यापुढे जशास तसे उत्तर देणार, सकल हिंदू समाज बांधवांचा इशारा; शेवगाव घटनेच्या निषेधार्थ पाथर्डीत मोर्चा | पुढारी

यापुढे जशास तसे उत्तर देणार, सकल हिंदू समाज बांधवांचा इशारा; शेवगाव घटनेच्या निषेधार्थ पाथर्डीत मोर्चा

पाथर्डी (नगर), पुढारी वृत्तसेवा: शेवगावात धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेवर दगडफेक करण्याचा प्रकार निंदनीय आहे. येथून पुढे आम्ही जशास तसे उत्तर देऊ, अन्याय होत असल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. शोभायात्रेवर दगडफेक करणार्‍या अपप्रवृत्तीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवारी (दि.16) पाथर्डी शहर व तालुका सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने पाथर्डी शहर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच, पाथर्डी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाची सुरुवात सकाळी शहरातील नवीपेठ येथील माधवराव निर्‍हाळी नाट्यगृहापासून करण्यात आली. हा मोर्चा नवीपेठ, कोरडगाव चौक, वसंतराव नाईक चौकातून नगररोड मार्गे पोलिस ठाण्यावर नेण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम, अपप्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्याच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या.

मोर्चा पोलिस ठाण्यात आल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत अशा अपप्रवृत्तींच्या लोकांवर कारवाईची मागणी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शेवगाव येथे घडलेला प्रकार निंदनीय असून, या प्रकरणातील सर्वच आरोपींना तत्काळ जेरबंद करून, त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी विविध वक्त्यांनी केली.

मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरूडे, मनसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेकाळ, अमोल गर्जे, मुकंद गर्जे, अशोक चोरमले, अजय भंडारी, अविनाश पालवे, भाऊ तुपे, किशोर परदेशी, सचिन नागापुरे, परमेश्वर टकले, अंकुश चितळे, लक्ष्मण डांगे, किरण दरंदले, प्रताप तांदळे, पप्पू पालवे, रवी गायकवाड, महेश बाहेती, सोमनाथ बंग, देवा पवार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या घटनेची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून सर्वांनीच शांत राहावे, असे आवाहन तहसीलदार शाम वाडकर यांनी केले. मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला. या नंतर सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तहसीलदार वाडकर, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे हे मोर्चेकर्‍याना सामोरे गेले. या घटनेची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, सर्वांनीच शांत राहावे, असे आवाहन तहसीलदार वाडकर यांनी केले.

Back to top button