जामखेडच्या सभापती पदाची भाजपला लॉटरी, ईश्वरी चिठ्ठीतही पवार-शिंदेंची बरोबरी; उपसभापतीपद राष्ट्रवादीला | पुढारी

जामखेडच्या सभापती पदाची भाजपला लॉटरी, ईश्वरी चिठ्ठीतही पवार-शिंदेंची बरोबरी; उपसभापतीपद राष्ट्रवादीला

जामखेड (नगर), पुढारी वृत्तसेवा: जामखेड बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदांसाठी आज हाय होल्टेज ड्रामा पाहावयास मिळाला. सभापती आणि उपसभापती निवडीसाठी मंगळवारी झालेल्या गुप्त मतदानात दोघांनाही समसमान मते मिळाली. यानंतर ईश्वर चिठ्ठी कौल घेतला गेला. त्यात सभापतीपद भाजपला, तर उपसभापतीपद राष्ट्रवादीला मिळाले. एकाचा सभापती तर दुसर्‍याचा उपसभापती झाल्याने ईश्वर चिठ्ठीतही दोन्ही पक्षांना समान कौल मिळाला.

जामखेड बाजार समितीचे सभापती, उपसभापती निवडीसाठी आज बैठक बोलविण्यात आली होती. मतदानानंतर आ. शिंदे व आ. पवार यांचे समसमान 9-9 संचालक विजयी झाले होते. आता सभापती निवडीत कोण फुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावत संचालक फुटणार नाहीत याची दक्षता घेतली. त्यानुसार सभापती, उपसभापती पदासाठी समान 9-9 मते मिळाली. ईश्वर चिठ्ठीने सभापती पदावर भाजपचे शरद कार्ले, तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी व राळेभात गटाचे कैलास वराट यांची नावे निघाली.

बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीला 9-9 जागा मिळाल्याने सभापती पदाचा तिढा वाढला होता. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीच्या लॉटरीत भाजपच्या शरद कार्ले यांचे नशीब उघडले, तर उपसभापतीपदी कैलास वराट यांची निवड झाली. चिठ्ठीने दोघांनाही सत्तेत बसविले. मंगळवारी (दि.16) बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. सर्व 18 संचालकांना 1 वाजता बाजार समितीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत अजेंडा दिला होता. दुपारी 1 ते 1.30 पर्यंत अर्ज वाटप व स्वीकृतीसाठी वेळ होता.

या वेळेत सभापती पदासाठी भाजपकडून शरद कार्ले, तर राष्ट्रवादी व राळेभात गटाचे सुधीर राळेभात यांनी अर्ज दाखल केला. तर, उपसभापती पदासाठी भाजपचे सचिन घुमरे, राष्ट्रवादी व राळेभात गटाचे कैलास वराट यांनी अर्ज दाखल केला. यानंतर 1.30 ते 1.45 पर्यंत अर्जांची छाननी झाली. यात सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. वैध अर्जांची यादी प्रसिद्धी करून दुपारी 2 ते 2.15 पर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी वेळ होती. तर, अंतिम यादी 2.20 वाजता जाहीर करण्यात आली. मतदान प्रक्रिया 2.25 ते 3 पर्यंत घेण्यात आली. यावेळी गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये सभापती व उपसभापती पदाची मतमोजणी 3 ते 3.15 या वेळेत झाली. यात दोन्ही गटांना समान मते मिळाली. त्यामुळे या निवडीसाठी ईश्वर चिठ्ठीचा आधार घेण्यात आला. यामध्ये पूजा जाट व रिद्धी जाट या बहिणींच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. सुरुवातीला उपसभापतीपदाची चिठ्ठी काढण्यात आली.

उपसभापती पदासाठी भाजपकडून सचिन घुमरे, तर राष्ट्रवादी व राळेभात गटाकडून कैलास वराट यांच्यात चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये कैलास वराट यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. यामुळे उपसभापती पदासाठी त्यांची निवड झाली. यानंतर राष्ट्रवादीकडून जल्लोष करण्यात आला. तर, सभापतीपदासाठी भाजपकडून शरद कार्ले, तर राष्ट्रवादी व राळेभात गटाचे सुधीर राळेभात यांच्यात चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये भाजपचे शरद कार्ले यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. दुपारी साडेतीन वाजता निकाल घोषित करण्यात आला. यावेळी भाजपकडून आतषबाजी करण्यात आली. प्राधिकृत अधिकारी म्हणून राजेंद्र निकम, तर सहप्राधिकृत अधिकारी म्हणून एन. बी. मुंडे यांनी काम पाहिले.

गुप्त मतदान होऊनही समान मते

भाजप, राष्ट्रवादीला 9-9 समान जागा मिळाल्याने सभापती पदाचा तिढा वाढला. त्यामुळे सर्व 18 संचालक गुप्त मतदान करण्याबाबत सहमती झाली. त्यानुसार गुप्त मतदान घेतले तरी भाजप 9, राष्ट्रवादीला 9 असे समान मते मिळाली. संचालक फुटणार अशी चर्चा होती; परंतु समान मते मिळाल्याने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला.

Back to top button