गौतमी पाटीलचा कार्यक्रम प्रथमच झाला राड्याविना ! | पुढारी

गौतमी पाटीलचा कार्यक्रम प्रथमच झाला राड्याविना !

बोटा; पुढारी वृत्तसेवा : एरवी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा होत असल्याचे सर्वश्रूत आहे, परंतु संगमनेर तालुक्यातील पठार भागातील म्हसवंडी येथे कला व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त रिलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास महिलांसह संपूर्ण गावाने उत्स्फूर्त दाद देत जल्लोश केला. विशेषत: महिलांचा प्रतिसाद पाहून गौतमी पाटीलने नाचता- नाचता मध्येच स्टेजवरून खाली उतरत शाळकरी मुलीसह ज्येष्ठ महिलांसोबत नाचत सकारात्मक राडा केल्याने हा नृत्याविष्कार अविस्मरणीय ठरला!

अवघ्या महाराष्ट्रात सोशल मीडियाचा अधिराज्य गाजवणार्‍या रिल्सस्टार गौतमी पाटीलने अदाकारीसह नृत्यकला अविष्कारातून हजारो प्रेक्षकांना घायाळ केले. गौतमी पाटीलचा कार्यक्रम… तिचे चाहते अन् तरुणाईचा राडा हे जणू सूत्र ठरलेलं असतं. बहुतांश वेळा अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम मध्येच बंद करण्याची वेळ आली, परंतु तिच्या नृत्यापेक्षा सध्या राड्याचीच चर्चा अधिक असते. स्टेजवरून खाली उतरताच गौतमीने चंद्रा गाण्यावर ठेका धरला. बराच काळ हा नुसचा राडा सुरू होता अन अन्य प्रेक्षक फक्त पाहत होते.

या कार्यक्रमासाठी घारगावचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला. खासगी सुरक्षारक्षक यांचेही नियोजन केले होते. या कार्यक्रमात गौतमी पाटीलसोबत गावातील तरुणाईसह चिमुकल्यांनी देखील ठेका धरला. दरम्यान, म्हसवंडी ग्रामस्थांचे योग्य नियोजन आणि तरुणाईच्या समंजसपणामुळे गौतमी पाटीलचा हा कार्यक्रम पहिल्यांच अगदी शिस्तीत पार पडला.

स्टेजवरून उतरत गौतमी ‘राड्यात’सहभागी..!

म्हसवंडीगावात गौतमीच्या कला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांनी केले होते. या गावात देखील तिच्या कार्यक्रमात राडा झाला, परंतु तो टारगट तरुणाईचा नव्हे तर मुलींसह महिलांच्या बेफाम नृत्याचा. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून गौतमी पाटील स्टेजवरून उतरत चक्क या ‘राड्यात’ सहभागी झाली. तुफान रंगलेल्या या कार्यक्रमात तिने महिला, मुलींसोबत बेफाम डान्स केल्याने ही चर्चा आता सर्वत्र रंगत आहे. चाहत्यांनी हुल्लडबाजी न करता तिच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

Back to top button