पारनेर : राष्ट्रवादीने शिवसेनेला फसविले : डॉ. श्रीकांत पठारे | पुढारी

पारनेर : राष्ट्रवादीने शिवसेनेला फसविले : डॉ. श्रीकांत पठारे

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत शिवसेनाला एकही पद मिळाले नाही. शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला फसविल्याची तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केली.. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने एकत्र येत माजी आमदार विजय औटी, आमदार नीलेश लंके व माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करीत बाजार समितीवर सर्व जागा मिळवून एकहाती सत्ता मिळविली.

यामध्ये राष्ट्रवादीचे 13 तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 5 संचालक निवडून आले होते. महाविकास आघाडीच्या सर्वच संचालकांना सभापती, उपसभापतिपदे मिळावीत, म्हणून प्रत्येक 1 वर्षांचा कार्यकाळ ठेवून रोटेशन पद्धतीने सर्वांना पदे मिळतील, अशी प्राथमिक चर्चा झाली होती. परंतु शिवसेनेच्या एकही संचालकला साधी विचारणा केली नसल्याचे पठारे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीकडून प्रतिसाद नाही

पदाधिकारी निवडीसाठी शिवसेना ठाकरे गट संचालकांची बैठक माजी आमदार विजय औटी यांच्यासोबत झाली सत्तेत सहभाग मिळावा, अशी मागणी शिवसेनेच्या संचालकांची होती. या संदर्भात माजी आमदार विजय औटी यांनी राष्ट्रवादी नेत्यांशी संपर्क केला. परंतु प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती डॉ. श्रीकांत पठारे यांनी दिली

महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित निवडणूक लढविली.त्यामुळे पदाची अपेक्षा होती. परंतु पदांसंदर्भात आमचे काही ठरले नव्हते. त्यामुळे नाराज होण्याची काहीच कारण नाही.

                        रामदास भोसले, जिल्हा उपप्रमुख, शिवसेना

शिवसेना ठाकरे गटाचे येथील सर्व निर्णय मी घेत असतो. सभापती, उपसभापती निवडीवर कोणीही नाराज असण्याचे कारण नाही. त्यासंदर्भात कोणी काही प्रतिक्रिया दिली, ते महत्त्वाचे नाही.

                                             विजय औटी, माजी आमदार

 

Back to top button