अहमदनगर जिल्ह्यातील महसूल कर्मचार्‍यांना बदल्यांची प्रतीक्षा | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यातील महसूल कर्मचार्‍यांना बदल्यांची प्रतीक्षा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : बदल्यांची प्रक्रिया 31 मेपर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्हा परिषद व पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या उरकल्या आहेत. मात्र, महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रिया अद्यापि सुरु झालेली नाही. बदल्या कधी होणार याची प्रतीक्षा कर्मचार्‍यांना लागली आहे. दरम्यान, महसूल विभागातील जवळपास 145 ते 150 कर्मचार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

मे महिना लागला की, सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना बदल्यांचे वेध सुरु होतात. दरवर्षी 31 मेअखेर बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रशासकीय आणि विनंती बदल्या केल्या जातात. जिल्हा परिषद, पोलिस व इतर काही शासकीय कार्यालयांत कर्मचारी बदल्यांचे काम पूर्ण झाले आहे.

महसूल विभागाचे सर्वेसर्वा जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्या बदल्या झालेल्या असून, या जागांवर नवीन अधिकारी नियुक्त झालेले आहेत. एप्रिल महिन्यात 10 उपजिल्हाधिकारी व सहा तहसीलदारांच्या देखील बदल्या झाल्या आहेत. आता नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडलाधिकारी, महसूल सहाय्यक व वाहनचालक संवर्गातील पात्र अधिकारी -कर्मचार्‍यांना बदल्यांचे वेध लागले आहे.
एकूण कार्यरत कर्मचारी संख्येच्या 30 टक्के बदल्या होणार आहेत. त्यानुसार अव्वल कारकून संवर्गातील 45 ते 50, मंडलाधिकारी संवर्गातील 35 कर्मचार्‍यांच्या तसेच महसूल सहाय्यक संवर्गातील 60 व वाहनचालक संवर्गातील चार अशा जवळपास 150 कर्मचार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

मात्र, महसूल विभागातील बदलीपात्र कर्मचार्‍यांची यादी तसेच रिक्त पदाची यादी जिल्हा प्रशासनाने प्रसिध्द केली नाही. यादी प्रसिध्द केल्यानंतर प्रत्येक पात्र कर्मचार्‍यांकडून 10 पसंतीक्रम मागविले जात आहेत. परंतु 31 मे ही तारीख जवळ आला तरीही महसूल प्रशासनाकडून बदली प्रक्रिया सुरु झालेली नाही. त्यामुळे पात्र कर्मचारी धास्तावले आहेत.

Back to top button