शेवगाव तालुका : ‘केदारेश्वर’च्या निवडणुकीचा बिगूल वाजला | पुढारी

शेवगाव तालुका : ‘केदारेश्वर’च्या निवडणुकीचा बिगूल वाजला

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. कारखान्याच्या निवडणुकीचा बिगूल वाजल्याने इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कारखान्यावर राष्ट्रवादीचे अ‍ॅड. प्रताप ढाकणे व ऋषिकेश ढाकणे यांचे वर्चस्व आहे. गेल्या दोन पंचवार्षिक ही निवडणूक बिनविरोध होत राहिली. त्यामुळे ही निवडणूकही बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कारखान्याचे 19 संचालक असे

निवडणुकीत सर्वसाधारण जागेसाठी बोधेगाव 2, हातगाव 3, मुंगी 3, चापडगाव 3, हसनापूर 2 अशा 13 जागा आहेत. तर उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी 1, अनु. जाती/अनु. जमाती प्रतिनिधी 1 जागा, महिला प्रतिनिधी 2, इतर मागास प्रवर्ग 1, भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रतिनिधी 1 अशा 19 संचालक निवडून द्यावयाच्या आहेत.

निवडणुकीचा कार्यक्रम असा

कारखान्याच्या निवडणुकीसाठी आजपासून (दि. 15 मे) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. ही मुदत 19 मेपर्यंत असून, दाखल अर्जांची छाननी 22 मे रोजी, तर 6 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 7 जून रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. 18 जून रोजी मतदान होईल, तर 19 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

Back to top button