राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात उष्णतेच्या पार्‍यात मोठी वाढ | पुढारी

राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात उष्णतेच्या पार्‍यात मोठी वाढ

वळण(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील पूर्व ग्रामीण भागात उष्णतेच्या पार्‍याची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीतील पाणाीसाठा कमी झाल्याने विहिरींसह कूपनलिकेंच्या पाण्यात घट झाली आहे. पिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने शेतातील पिके कोमजली आहेत.

राहुरीच्या पूर्व भागात आतापर्यंतच्या सर्वात उच्चांकी तापमानाची आकडेवारी मागे टाकत सुमारे 44 अंश तापमानाने पारा गाठल्यामुळे व त्यातच या भागातील वीजपुरवठा खंडित असल्याने दिवसभर उकाड्याने ग्रामस्थ हैराण झाले होते. घरात घामाच्या धाराने जीव लाहीलाही होत होता. तर बाहेर उन्हाच्या झळयाने जीव कासावीस होत आहे.

राहुरी तालुक्यातील वळण, मानोरी, पिंपरी वळण, चंडकापूर, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, आरडगाव, मांजरी आदि परिसरातील गाव वाड्या वस्त्यावरील उष्णतेने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत सुमारे 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा हा पारा वाढल्यामुळे त्याचा जनजीवनावर मोठा विपरीत परिणाम झाला.

आवश्यक असलेले शेतीची कामे ही बंद ठेवून शेतकरी झाडाखाली विसावलेले दिसत होते. जणू काही सूर्य आगच ओकत असल्याने जीवाची लाहीलाही होत होती. त्यातच पूर्व भागातील वीजपुरवठा सकाळी नऊ पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत खंडित होता. याबाबत महावितरणाने प्रसिद्धीपत्रक अगोदरच प्रसिद्ध केले होते. परंतु सावधगिरी म्हणून काहीही करणे शक्य नसल्याने, हातात मिळेल त्या वस्तूने हवा घालून शरीर थंड करण्याचा प्रयत्न केला जात होता.

आत्तापर्यंतच्या सर्व उन्हाळ्याचे रेकॉर्ड शनिवारच्या 44 अंश सेल्सिअसने मोडीत काढली आहेत. यामुळे केवळ मानवी जीवनावरच नव्हे तर पशुपक्ष्यावरही या उष्णतेचा मोठा परिणाम जाणवत होता. जनावरे झाडाखाली, गोठ्यात असून देखील धापा टाकत होती. यामुळे दूध व्यवसायिकांनी गाय, म्हैस आदि जनावरांना नेहमीपेक्षा दोन-तीन वेळेला अधिक पाणी दिले. पुढील उर्वरित उन्हाळ्याच्या काळ कसा जाणार, वीज पुरवठाही सुरळीत राहणार की नाही ही चिंता आहे.

Back to top button