नगर : सेतू चालकाला भाडे देण्याचे आदेश | पुढारी

नगर : सेतू चालकाला भाडे देण्याचे आदेश

संगमनेर शहर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : तहसील कार्यालयाच्या शासकीय इमारतीत सुरू असलेल्या सेतू कार्यालयाच्या संचालकांनी सन 2014 पासून जागेचे भाडे भरले नाही. सदर जागेचे 18 लाख 47 हजार 456 रुपये भाडे भरावे असे आदेश संगमनेरचे तत्कालीन तहसीलदार अमोल निकम यांनी दिले आहे. सेतू कार्यालयाने वर्षाचे भाडे थकविल्याचे प्रकरण भाजपचे कार्यकर्ते अमोल खताळ यांनी उघडकीस आणले आहे. माहिती अधिकारात केलेल्या पत्रव्यवहारामुळे सेतू चालकांचा जागेचा हा लाखो रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. अ‍ॅड. नानासाहेब शिंदे (वाघापूर) आणि गोरक्षनाथ भीमाजी वर्पे यांच्या संस्थेमार्फत संगमनेर तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये सेतू कार्यालय चालवण्यात येत होते. ऑगस्ट 2014 ते मार्च 2023 अखेर पर्यंतचे जागा भाडे सदर संस्थेने थकविले असून हे भाडे भरावे, असे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.

अमोल खताळ यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये तहसीलदार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर माहिती अधिकार अंतर्गत तहसील कार्यालय बिल्डिंगमधील सेतूसाठी वापरात असलेल्या जागा वापरण्यासाठी तहसीलदार संगमनेर यांच्याकडे परवानगी प्रत, भाडे करारनामा प्रत, किती वर्षापासून सुरू आहे? अशी माहिती मागविली. कुठलाही करार, भाडे सेतूकडून घेतले जात नसून एक प्रकारे ते विनापरवाना सुरू असल्याचे उघड झाले. तहसील कार्यालयाच्या इमारती मधील सेतू केंद्र 30 नोव्हेंबर 2022 रोजी एका आदेशाने तत्काळ बंद करून तो सेतू हॉल खाली केला असल्याची माहिती खताळ यांनी दिली.

संगमनेर तहसील कार्यालयाच्या शासकीय इमारतीमध्ये विनापरवाना राजकीय सुरू असलेल्या सेतूमधून विविध दाखले देताना मनमानी पद्धतीने पैसे घेतले जात होते. तसेच दाखले देताना अडवणूक केली जात होती. नागरिकांना अरेरावीची भाषा वापरली जात होती. वशिलेबाजी करून दाखले दिले जात होते.

तहसीलदारांच्या पगारातून भाडे वसूल करा
संबंधित सेतू चालकांनी भाडे भरलेले नसल्यामुळे त्यांच्याकडून तत्काळ भाडे वसुली करावी अन्यथा 2014 पासून 2023 पर्यंत असलेल्या तहसीलदार यांच्या पगारातून भाडे रक्कम वसूल केली जावी. तसेच विनापरवाना सेतू सुरू आहे हे माहित असताना सुद्धा त्याला पाठबळ देणार्‍या 2014 पासूनच्या तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यावर शासकीय मालमत्ता गैरवापर होत असताना शासनाचे आर्थिक नुकसान केले प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी अमोल खताळ यांनी महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

Back to top button