

चिचोंडी पाटील : (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : नगर-जामखेड महामार्गावर बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ कारवाई करणार्या या पोलिस कर्मचार्यांची मोठी चर्चा सुरू आहे. या महामार्गावर कार्यवाहीचे नागरिकांमधुन स्वागत तर होतच आहे मात्र विशेष बाब म्हणजे जे पोलिस या कारवाईसाठी येतात ते पोलिस स्वतः बिना हेल्मेट दुचाकी वाहन चालून कायद्याचे ज्ञान कशी देऊ शकतात ,अशी चर्चा आहे.
मागील काही आठवड्यांपासून पोलिसांकडुन विविध ठिकाणी थांबुन वाहन चालकांना दंड आकारण्यात येत आहे. यामध्ये बिना हेल्मेट, लायसन, सिटबेल्ट,अवैध प्रवाशी वाहतूक अशा प्रकारचे कायद्याचे उल्लंघन करणार्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यात येतो.
नगर-जामखेड महामार्गावर अनेक ग्रामीण भागातील गावे वसली आहेत. दुचाकीवरुन शेतात जाणार्या शेतकर्यांनाही नियमाचे धडे देत पोलिसांकडून दंडाची आकारणी केली जात आहे. या महामार्गावर विविध गुन्हे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यांतील कर्मचार्यांनी उघडकीस आणले आहेत, मात्र अनेकदा या पोलिसांकडून रोख स्वरूपात रक्कम घेऊन पुन्हा ऑनलाईन पद्धतीने दंडही आकारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र हजार पाचशे रुपयांसाठी पोलिसांशी वैर कोण घेणार असे म्हणत नागरिकांनी मेरीभी चूप, तेरीभी चूप ठेवली आहे. एका वाहन चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दैनिक पुढारीशी बोलताना हा सर्व प्रकार सांगितला.
वाहतूक पोलिसांची वर्दी गायब
एखाद्या पोलिस ठाण्यात ट्राफिकसाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांना प्रवासी कारवाई करताना किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांची वर्दी घालणे बंधनकारक आहे. मात्र हेच पोलिस नियम पायदळी तुडवत नागरिकांना कायद्याचे धडे कसे देऊ शकतात,असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.