संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली असून पाणी पातळी खालावली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढली आहे. सध्या 7 गावे व 19 वाड्यांना 6 टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती गटविकास अधिकारी अनिल नेमाणे यांनी दिली. गेल्या तीन चार वर्षांपासून टँकरची मागणी सातत्याने कमी होत आहे. समाधान कारक पाऊस व अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागात पाणी साठा समाधान कारक असून टँकरची मागणी कमी व उशिरा होवू लागली आहे. यंदाही टँकरची मागणी एप्रिल महिन्यात सुरू झाली.
उन्हाची तीव्रता वाढत चालली असून आता टँकर मागणचे प्रस्ताव दाखल होऊन टँकर सुरू झाले आहे. तालुक्यातील चौधरवाडी, दरेवाडी, डोळासणे, कर्जुलेपठार, गुंजाळवाडी पठार, पोखरी बाळेश्वर व पिंपळगाव देपा या सात गावांना व गावांतर्गत येणार्या विविध 19 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. या साठी 6 शासकीय टँकर सूर असून या टँकरच्या 20 फेर् या होतात. नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या करिता काही विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. तेथून टँकर भरून गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून ग्रामीण भागात पाण्याची मागणी वाढली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अनिल नेमाणे म्हणाले , पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहावा या करीता पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभाग सातत्याने पाठपुरावा करत आहे. प्रस्ताव येताच तो मंजुरीसाठी पाठविण्यात येतात. मंजूरी येताच टँकर सुरू होतात. तालुका मोठा असल्याने गावांचे अंतर अधिक आहे. गावागावात आता टँकर सुरू आहे. अधिकारी , कर्मचारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.