नगर : स्वच्छतागृह तपासणी युद्धपातळीवर | पुढारी

नगर : स्वच्छतागृह तपासणी युद्धपातळीवर

पारनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील 89 माध्यमिक विद्यालयांपैकी 66 विद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे नसल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारामुळे समोर आली. यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात पालक व विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. याविषयीच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर तालुका शिक्षण विभागाला जाग आली असून तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील स्वच्छतागृह तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

याबाबत पारनेर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांनी तालुक्यातील सर्व शाळांतील स्वच्छतागृहांची तपासणी करण्याबाबत सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख व विषय साधन व्यक्ती विशेष शिक्षक यांच्या नियुक्ती केल्या आहेत, त्यांना काढलेल्या पत्रात म्हटले आहे की वर्तमानपत्रातील बातम्यांचा संदर्भानुसार 66 माध्यमिक शाळांमध्ये स्वच्छतागृहे नसल्याच्या बातम्या छापून आल्या.
त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासोबत चर्चा करून तालुक्यातील सर्व शाळांतील स्वच्छतागृहांची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

त्यानुसार नियुक्त केलेल्या यंत्रणेने भेटीच्या दिवशी शाळा सुरू करण्याबाबत अवगत करावे व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख विषय साधन व्यक्ती विशेष शिक्षक यांनी सर्व शाळांना भेटी देऊन फोटोसह अहवाल कार्यालय सादर करावा, असे सूचित केले आहे. त्यानुसार स्वच्छतागृहांची पडताळणी संबंधित यंत्रणेकडून आठवड्याभरात होणार आहे. त्याचे शाळानिहाय नियोजन करण्यात आले आहे.
परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी माहितीच्या अधिकारात तालुक्यातील स्वच्छतागृहांची माहिती मागितली होती. त्यामध्ये शिक्षण अधिकारी कार्यालयातून तालुक्यातील 79 पैकी 66 विद्यालयात स्वच्छतागृह नसल्याची माहिती दिली गेली होती.

स्वच्छतागृह सुविधा व स्वच्छता तपासा !
तालुका शिक्षण विभागाने युद्धपातळीवर तालुक्यातील सर्व शाळेतील स्वच्छतागृहांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे; मात्र हे करत असताना स्वच्छतागृहांची सुविधा व स्वच्छता याचा विचार होणे गरजेचे आहे. फक्त कागदावर अहवाल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समजते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

Back to top button