नगर : बायजामाता यात्रोत्सव दगडफेक प्रकरण; जेऊरमधील 14 आरोपींना अटक | पुढारी

नगर : बायजामाता यात्रोत्सव दगडफेक प्रकरण; जेऊरमधील 14 आरोपींना अटक

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जेऊरचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दि.7 मे रोजी झालेल्या दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पसार आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

जेऊरच्या यात्रोत्सवात दोन गटांत झालेल्या दगडफेकीत यात्रेतील दुकानदार महिला, लहान मुले व काही ग्रामस्थ, असे सुमारे दहा ते बारा जण जखमी झाले होते. दगडफेकीनंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. सदर प्रकरणी पोलिस नाईक दीपक गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून सुमारे दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक अजित पाटील यांनी गावात येऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली 14 आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पसार आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके नियुक्त करण्यात आली असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे. घटनेला पाच दिवस उलटून देखील गावात तणावपूर्ण शांतता आहे. गावात घोळक्याने जमणारे लोक, तसेच टारगट मुलांचा वावर पूर्णतः बंद झाल्याचे चित्र दिसत आहे. राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक, तसेच एमआयडीसी पोलिसांचा मोठा बंदोबस्त गावात आहे. गावात घडणार्‍या प्रत्येक बारीक घटनेवर, तसेच सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर आहे. गावातील अनेक व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप पोलिसांच्या भीतीने बंद झाल्याचे दिसून येते. गावात शांतता राखण्याचे आवाहन पोलिसानी केले आहे.

अन्यथा कायदेशीर कारवाई
ग्रामस्थांनी शांतता राखावी. सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून जातीय तेढ निर्माण होईल, असे संदेश प्रसारित करू नयेत. अफवा पसरवू नयेत. अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा-सुव्यवस्थेचे पालन करावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सपोनि राजेंद्र सानप यांनी म्हटले आहे.

गावातील अनेक तरुण गायब!
पोलिसांकडून आरोपींची शोध मोहीम सुरू झाली असल्याने, दोन्ही गटांतील अनेक तरुण गावातून गायब झाले आहेत. अटकेच्या भीतीपोटी मोबाईल बंद करून हे तरुण गायब झाल्याचे चित्र गावामध्ये दिसून येत आहे.

Back to top button