धक्कादायक ! हॉस्पिटलमधून मृताच्या दागिन्यांची चोरी | पुढारी

धक्कादायक ! हॉस्पिटलमधून मृताच्या दागिन्यांची चोरी

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील साईदीप हॉस्पिटलमधून मृत महिलेच्या कानातील दागिने चोरीला गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यावरून तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पाराजी पोपट वाळके (रा. उक्कलगाव, ता. श्रीगोंदा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, ‘आमची आई भीमाबाई पोपट वाळके (वय 75) यांना साईदीप हॉस्पिटलमध्ये 22 एप्रिल 2023 रोजी दाखल केले होते. आईला अतिदक्षता विभागात दाखल केल्याने तिच्या अंगावरील दागिने आम्ही काढून घेतले. परंतु, कानातील खुटबाळ्या व सोन्याचे कुडके निघत नसल्याने तसेच ठेवले होते.

24 एप्रिल रोजी डॉक्टरांनी आईचे निधन झाल्याचे सांगितले. आम्ही आईच्या मृतदेहाजवळ गेलो असता कानातील खुटबाळ्या होत्या. त्यानंतर हॉस्पिटल कर्मचार्‍यांनी आम्हाला साडी आणण्यास पाठविले. आम्ही साडी नेसवून शाल गुंडाळून मृतदेह ताब्यात देतो, असे सांगितले आणि आम्हाला बाहेर पाठविले. त्यानंतर सायंकाळी साडी नेसवून व तोंडाला शाल गुंडाळून डॉक्टरांनी मृतदेह आमच्या ताब्यात दिला. गावी गेल्यानंतर मृतदेह आंघोळीसाठी बाहेर काढला आणि तोंडाला गुंडाळलेली शाल काढली असता कानात खुटबाळ्या दिसल्या नाहीत. कुडके मात्र कानात होती. आईच्या कानातील खुटबाळ्या कोणीतरी काढून घेतल्याचा संशय आम्हाला आला. आम्ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व कर्मचार्‍यांकडे तक्रार केली. मात्र, येथे कोणीही दागिने काढून घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button