नगर जिल्ह्यात तापमानाची चाळीशी ; अंगाची लाही लाही | पुढारी

नगर जिल्ह्यात तापमानाची चाळीशी ; अंगाची लाही लाही

नगर : पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसानंतर आता वाढत्या उन्हाचा कहर सुरु झाला आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला. गुरुवारी सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. तामपानाचा पारा 40 अंश सेल्सिअस इतका नोदविला गेला. त्यामुळे दिवसभर जनतेच्या अंगाची लाही लाही झाली. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन, सतर्कता बाळगा. उष्माघाताचे लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने जनतेला केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जनता अवकाळी पावसाने त्रस्त झाली. या पावसाने रब्बी पिकांबरोबरच फळबागांचे नुकसान झाले. वादळी वारा आणि वीज कोसळून दहा जण दगावले आहेत. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने दोन महिने मुक्काम ठोकला होता. त्यामुळे गेले दोन महिने उन्हाळ्याचा चटका जाणवला नाही. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे.

सकाळपासूनच तापमान वाढू लागले. दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील झाले. त्यामुळे टोप्या, उपरणे, छत्र्या बाहेर आल्या आहेत. उन्हाच्या किरणांनी रस्ते तापू लागले आहेत. थंड पेयाच्या दुकानात गर्दी वाढली आहे. गेल्या तीन दिवसांपासून उकाडा वाढू लागला. गुरुवारी सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याने तापमानाची नोंद 40 अंश सेल्सिअस इतकी झाली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. उष्माघातापासून व्यक्ती, पशु- प्राणी याची हानी होऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जनतेला सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.

दुपारी घराबाहेर पडणे टाळा
बाहेर पडताना टोपी अथवा छत्रीचा वापर करा, शक्यतो दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत घराबाहेर पडू नका, पुरेसे पाणी प्या. तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाने पाणी प्या.सूर्य प्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे व झडपांचा वापर करा.प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा, उन्हात काम करणार्‍यांनी ओल्या कापडाने डोके, मान व चेहरा झाकावा, चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा, दारु, चहा, कॉफी घेऊ नका, उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Back to top button