

पाथर्डी तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीत राजकीय समीकरणे साधण्यासाठी 'ओबीसी फॅक्टर' वापरला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या अनुषंगाने पदासाठी पाथर्डी येथील भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल कारखिले यांचे नाव चर्चेत आहे. कारखिले यांच्यासह नगर तालुक्यातील युवराज पोटे व कर्जत तालुक्यातील शांतीलाल कोपनर यांच्या नावांचीही चर्चा होताना दिसत आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष निवडीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्यासाठी प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी हे नगरमध्ये आले असून, ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. जिल्हाध्यक्ष पदासाठी ओबीसी चेहर्याचाही विचार होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर कारखिले, पोटे व कोपनर यांची नावे चर्चेत आहेत.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे नगरचे पालकमंत्री पद आहे. ते मराठा समाजातील मोठे नेते असल्याने पक्ष संघटनेतील जिल्हाध्यक्षपद ओबीसी समाजाला देण्याची चर्चा आहे. यातून जातीय समीकरण संतुलित ठेवण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभा या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'ओबीसी फॅक्टर'चा विचार होऊ शकतो, असे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.
या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष पदासाठी राहुल कारखिले (पाथर्डी) यांचे नाव आघाडीवर आहे. ते भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष असून, त्यांनी जिल्हा सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे. त्यांच्याशिवाय युवराज पोटे (नगर तालुका) व शांतीलाल कोपनर (कर्जत) यांचीही नावे चर्चेत आहेत. कारखिले हे भाजपचे सक्रिय पदाधिकारी असून, मोठे उद्योजक आहेत. त्यांच्या रूपाने नवीन जिल्हाध्यक्ष लाभल्यास पक्ष वाढीसाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो, असे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.