नगर : गावठी पिस्तुलांसह दोघे श्रीरामपुरात गजाआड | पुढारी

नगर : गावठी पिस्तुलांसह दोघे श्रीरामपुरात गजाआड

नगर : पुढारी वृत्तसेवा :  श्रीरामपूरमधील संजयनगर परिसरातून गावठी कट्ट्यांची विक्री करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. दोन जण पळून गेले. अटक केलेल्यांकडून दोन गावठी पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. अक्षय राजू फुलारे (वय 25), शहेबाज युनूस पटेल (वय 30, दोघे रा. संजयनगर, श्रीरामपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहारुख युनूस पटेल (रा. संजयनगर, श्रीरामपूर), फिरोज इब्राहिम पठाण (रा. शनिचौक, श्रीरामपूर) हे पसार झाले.

श्रीरामपूर येथील संजयनगर परिसरात दोन जण गावठी पिस्तुले विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने संजयनगरमध्ये सापळा लावला. त्या वेळी संशयास्पदरित्या येणार्‍या चौघांपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले व आठ जिवंत काडतुसे असा 52 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध श्रीरामपूरचे पोलिस कॉन्स्टेबल रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button