नगर जिल्ह्यातील 1.35 लाख शेतकर्‍यांच्या खात्यावर ‘अतिवृष्टी’चे अनुदान | पुढारी

नगर जिल्ह्यातील 1.35 लाख शेतकर्‍यांच्या खात्यावर ‘अतिवृष्टी’चे अनुदान

नगर : पुढारी वृत्तसेवा : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना थेट शासनाकडून नुकसानभरपाईपोटी अनुदान वाटप सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 34 हजार 904 शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 164 कोटी 78 लाख 92 हजार रुपयांचा निधी जमा झाला आहे. हे अनुदान मात्र, दुपट दराने आणि तीन हेक्टर क्षेत्रापर्यंत अदा करण्यात आलेले आहे. खरीप हंगामातील पिके जोमात असताना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीच्या फटक्यात काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झाले. या दोन महिन्यांत 1 लाख 55 हजार 356 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतिवृष्टीमुळे झाले. याचा आर्थिक फटका अडीच लाख शेतकर्‍यांना बसला. बाधित शेतकर्‍यांना दुपट दराने आर्थिक मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नुकसानभरपाईपोटी 290 कोटी 91 लाख 425 रुपयांच्या निधी शासनाकडे मागितला होता. शासनाने यासाठी 291 कोटी 4 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यामध्ये शेतजमिनीच्या नुकसानीचा 13 लाख 23 हजार रुपयांचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून बाधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाई अदा केली जात होती. यंदा मात्र, बाधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर थेट शासनाकडून अनुदान वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाकडून गेल्या काही दिवसांपासून अनुदान वाटप सुरु झाले आहे. तालुकास्तरावर 2 लाख 35 हजार 555 बाधित शेतकर्‍यांची संख्या अंतिम केली. त्यानुसार प्रशासनाने पोर्टलवर 2 लाख 15 हजार 36 शेतकर्‍यांची माहिती अदा केली. शासनाने 1 लाख 64 हजार 836 शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 198 कोटी 31 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान वर्ग केले. मात्र, त्यापैकी 1 लाख 34 हजार 904 शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 164 कोटी 78 लाख 92 हजार रुपये अनुदान जमा झाले आहे.

चुकीच्या माहितीमुळे अनुदान जमा होण्यास विलंब
बाधित शेतकर्‍यांचे चुकीचा खाते क्रमांक, चुकीचा आयएफएससी कोड, बँक खात्यास आधार लिंक नसणे तसेच खाते बंद असणे आदीमुळे 29 हजार 932 बाधित शेतकर्‍यांच्या खात्यावर 33 कोटी 52 लाख 88 हजार रुपयांचे अनुदान जमा झालेले नाही. शेतकर्‍यांची ही दुरुस्ती करुन पुन्हा पाठविले जाणार आहे.

शेतकरी संख्या आणि जमा अनुदान रक्कम कंसात
नगर 30 (1.68) , नेवासा 18331 (3463), श्रीगोंदा 19233 (3054), पारनेर7013 (895), पाथर्डी 15111 (1331.44), शेवगाव 25486 (2759), अकोले 20818 (1303), राहुरी 3548 (620), राहाता 15231 (1639.28), कोपरगाव 10103 (1411.85).

 

Back to top button