नगर : पोलिस अंमलदारांना कार्यमुक्त करा ; क्राईम मीटिंगमध्ये एसपी ओला संतापले | पुढारी

नगर : पोलिस अंमलदारांना कार्यमुक्त करा ; क्राईम मीटिंगमध्ये एसपी ओला संतापले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  पोलिस दलातील सुमारे 975 अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या होवून 10 दिवस उलटले तरी अंमलदार बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. बुधवारी झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी संताप व्यक्त करीत कर्मचार्‍यांना कार्यमुक्त करण्यासाठी रविवार पर्यंतची ‘डेडलाईन’ दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे पोलिस अधिकार्‍यांसह संबंधित कर्मचार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

पोलिस शिपाई, नाईक, हवालदार आणि सहायक फौजदार या पदावर काम करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना एका ठिकाणी पाच वर्ष सेवा देता येते. परंतु, ‘मलई’चे ठिकाण मिळाल्यामुळे अनेक कर्मचार्‍यांनी चांगलेच बस्तान बसविले होते. कार्यकाळ पूर्ण होवूनही अनेक कर्मचारी महत्वाच्या पोलिस ठाण्यांमध्ये ‘ठाण’ मांडून होते. पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथके तसेच स्थानिक गुन्हे शाखेमध्येच राहण्यासाठी असे कर्मचारी खूप ‘आटापिटा’ करीत असतात. ‘शिफारशिलाल’ व अधिकार्‍यांशी ‘सलगी’ ठेवणार्‍या कर्मचार्‍यांसोबत एसपी ओला कसे ‘रिअ‍ॅक्ट’ होतात याकडे सर्वांचे नजरा होत्या.

दरम्यान, ओला यांनी पहिल्यांदाच बदली दरबार भरवून ‘शिफारशीलाल’ कर्मचार्‍यांची कोंडी केली. वशिला झुगारत एसपींनी 975 कर्मचार्‍यांच्या बदलीचे आदेश शनिवारी (दि.29) रोजी काढले. पोलिस अधीक्षक यांनी केलेल्या पारदर्शी बदल्यांमुळे महत्त्वाच्या ठिकाणी ठाण मांडून असलेल्या कर्मचार्‍यांची ‘मक्तेदारी’ मोडीत काढली. परंतु, बदली होवूनही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर झाले नव्हते. याची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक ओला यांनी बदली झालेल्या कर्मचार्‍यांना कार्यमुक्त करण्याचे कडक शब्दांत अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत.

‘त्या’ कर्मचार्‍यांची कोंडी
जिल्हा पोलिस दलाची सशक्त ब्रँच म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘एलसीबी’तील सुमारे 35 अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश एसपींनी काढले. परंतु, आतापर्यंत केवळ 12 कर्मचारीच बदलीच्या ठिकाणी हजर झाले. त्यासोबतच पोलिस ठाण्यांतील ‘डीबी’ पथकांतील काही कर्मचारी त्याच ठिकाणी आहेत. एसपींनी आता रविवार पर्यंतची मुदत दिल्याने अंमलदारांना कार्यमुक्त केले जाते की नाही, हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.

झोपडपट्टी ‘दादा’ टार्गेटवर!
जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी रेकॉर्डवरील गुंडांवर तडीपारीच्या कारवाया करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक राकेश ओला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुंड व संघटीत टोळ्यांवर तडीपारीच्या कारवाया करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

Back to top button