नगर जिल्ह्यातील 75 ग्रामसेवक सोडणार ‘गाव’! 14 केंद्रप्रमुख, सहा विस्तार अधिकारीही ‘बाहेर’ | पुढारी

नगर जिल्ह्यातील 75 ग्रामसेवक सोडणार ‘गाव’! 14 केंद्रप्रमुख, सहा विस्तार अधिकारीही ‘बाहेर’

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षण व ग्रामपंचायत विभागातील 95 कर्मचार्‍यांच्या बुधवारी (दि. 10) प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या करण्यात आल्या. संबंधित कर्मचार्‍यांना 31 मेपूर्वी नवीन ठिकाणी हजर होण्याचे लेखी आदेश काढण्यात येणार आहेत. गुरुवारी (दि. 11) महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे व बांधकाम विभागातील कर्मचारी बदल्यांची प्रक्रिया होणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मिनी मंत्रालयात वर्ग तीन व वर्ग चारमधील कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी विनंती, प्रशासकीय तसेच आपसी पद्धतीने बदल्यांचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे.

काल बुधवारी शिक्षण व ग्रामपंचायत विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या. यात ग्रामसेवक 59, ग्रामविकास अधिकारी 16 आणि विस्तार अधिकारी दोन, तर शिक्षण विभागातील चार विस्तार अधिकारी आणि 14 केंद्रप्रमुख अशा एकूण 95 कर्मचार्‍यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सीईओ येेरेकर उपस्थित होते. बदलीपात्र कर्मचार्‍यांनीही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जागा सोडली नव्हती.

कर्मचारी संघटना सीईओंना भेटणार !
मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांना बदलीतून सवलत दिली जाते. मागेही अशाप्रकारे संघटनेचे पत्र असलेल्या पदाधिकार्‍यांना बदलीतून सवलत दिली होती. या वेळी मात्र सीईओंनी संघटनेच्या पत्रांचा विचार न करता पदाधिकार्‍यांच्याही बदल्या केल्या. त्यामुळे संघटनेच्या वतीने सीईओंना शासन आदेशासह संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी निवेदन देऊन विनंती करणार असल्याचेही सूत्रांकडून समजले.

Back to top button