शेवगाव : खरिपासाठी 59 हजार 834 हेक्टरचे उद्दिष्ट

शेवगाव : खरिपासाठी 59 हजार 834 हेक्टरचे उद्दिष्ट
Published on
Updated on

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यात यंदा 59 हजार 834 हेक्टरवर खरीप हंगामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, 18 हजार 319 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. याबाबत आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक पार पडली असून, यात अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या कृषी योजनांचा शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीसाठी उपयोग व्हावा, याचे भान ठेवून कृषी विभागाने प्रत्यक्षात त्या योजना ज्यांच्यासाठी आहेत त्या बळीराजापर्यंत जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार राजळे यांनी पंचायत समिती सभागृहात झालेल्या खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत केले.

ठिबक सिंचन, अस्तरीकरण अशा शेतकर्‍यांसाठी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याचा जास्तीतजास्त लाभ तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळाला पाहिजे. तसेच, जलयुक्त शिवार योजनेत तालुक्यातील 10 गावांचा नव्याने समावेश करण्यात आला असून, त्या योजनेंतर्गंत विविध कामांचा आराखडा शिवार फेरीतून कृषी विभागाने तयार करावा.
केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या दहिगावने कृषी विज्ञान केंद्राचे जिल्ह्यात सात तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे. तेथील शास्त्रज्ञांनी अन्य तालुक्यात देखील आपला संपर्क वाढवावा. शेतकर्‍यांसाठी विशेषतः महिलांसाठी शॉर्ट कोर्सेस करावेत. सध्या महिला बचत गट वाढत आहेत. शेती व्यवसायात महिलांचे योगदान पुरूषांच्या तोलामोलाचे आहे. त्यांच्यासाठी विशेष उद्बोेधनाचे कार्यक्रम घेण्याच्या सूचना आमदार राजळे यांनी यावेळी केल्या.

यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके, उपविभागीय कृषी अधिकारी पांडुरंग साळवे, उपअभियंता रमेश शिदोरे, उमेश भालसिंग, शिवाजीराव भिसे, जगदीश धूत, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप जावळे, बंडू सागडे यांच्यासह अनेकांनी चर्चेत सहभाग घेतला. तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी यंदाच्या खरीप हंगामाचा चित्रफितीद्वारे आढावा मांडला. मंडल कृषी अधिकारी गणेश वाघ यांनी सूत्रसंचालन केले. कानिफ मरकड यांनी आभार मानले.

पीक स्पर्धेतील शेतकर्‍यांचा सन्मान
गतवर्षी पीक स्पर्धेत ढोरजळगावने येथील अलका बळीराम लांडे यांनी प्रति हेक्टरी 32 क्विंटल बाजरी, आव्हाने येथील पुंडलिक काकडे यांनी प्रति हेक्टरी 35 क्विंटल तुरीचे उत्पन्न घेतले. तर, रावतळे येथील आप्पासाहेब रहाटळ यांनी 84 टन द्राक्षांची निर्यात केली. याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

आपटे यांना कृषी ड्रोनचे वितरण
शेवगाव येथ खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत राणेगाव येथील शेतकरी विवेक आपटे यांना आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते कृषी ड्रोन देण्यात आले. या ड्रोनची किंमत 10 लाख रूपये असून, त्यास शासनाचे 5 लाख रूपये अनुदान आहे. जिल्ह्यात आपटे हे ड्रोनचे पहिले व्यक्तिगत लाभार्थी ठरले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news